प्रवास एका फोटोचा!

आत्ता, दुपारी चार वाजता, मी दादरच्या टिळक ब्रिजवरून जाताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘परिचित’ फोटोने माझे लक्ष वेधले. खरेतर भूतकाळात नेले…
साधारणतः जानेवारी २००२ चा तो काळ होता. तरूण भारत, नागपूरमध्ये मुख्य संपादक म्हणुन मी काम करत होतो. तेव्हाचे नागपूर आजच्या सारखे “मोठे शहर” झाले नव्हते. बहुतेक लोक एकमेकांना ओळखत… माझ्यासारख्या मुंबईहून आलेल्या नवख्या माणसाची ओळख करून घेत… त्या दिवसात भाजपचे युवा आमदार असणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचे एखाद्या “मॉडेल” सारखे फोटो नागपूरस्थित सुप्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे यांनी काढले होते. विशेष म्हणजे, ते फोटो घेऊन एका ब्रँडची जाहिरात केली गेली होती. ज्याचे मोठे मोठे बिलबोर्ड धरमपेठ, बर्डी, इतवारी अशा गजबजलेल्या भागात लागले होते… दुसर्‍या दिवशी सिव्हिल लाईन्स भागात मॉर्निंग वॉक घेण्यासाठी गेलो असताना, झरझर पाउले टाकत निघालेले देवेन जी दिसले… त्यांनी काही बोलण्याच्या आधीच मी, फोटोंसाठी अभिनंदन केले… त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने…मनमोकळ्या हास्याने वातावरण भरून गेले.
का कुणास ठाऊक, आज मुख्यमंत्र्यांचा हा तरुणपणीचा फोटो पाहताना… आमच्या दोघांचा कॉमन जिवलग दोस्त, स्व मोहन जावडेकर याची तीव्र आठवण आली…
आणि डोळे पाणावले…
एकविसाव्या वर्षी नागपूरचे महापौर झालेल्या फडणवीस यांनी, आपल्या कार्यकाळात देशातील सर्व महानगरांच्या महापौरांची एक मोठी परिषद घेतली होती… आणि आपल्या व्यापक दृष्टीचा परिचय करून दिला होता. आज त्यांचा हा फोटो पाहताना ती महापौर परिषद आठवली आणि उपराजधानी नागपुरात, महापौर म्हणुन काम केलेल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजधानी मुंबईतील महापौर ठरवेपर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला…
त्यामुळे, हा पंचवीस वर्षांपूर्वी धरमपेठ किंवा बर्डीवर दिसलेला फोटो, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये पुन्हा झळकणे, मला खुप सूचक वाटते…

महेश म्हात्रे,
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *