स्वामी गोविंद गिरी यांची बदलती भूमिका आणि संतांचे अढळ स्थान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषणात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेतील ग्रंथस्वरूपाबाबत केलेली मांडणी मोठ्या वादाचे कारण ठरली आहे. त्यांच्या मते, दासबोध हा संतपरंपरेतील एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, “ज्ञानेश्वरी” आणि “एकनाथी भागवत” ही भाष्ये, तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या “गाथा”, या संकलनात्मक असल्याने त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येत नाही.
वरवर पाहता, ही भूमिका केवळ साहित्यप्रकारांचे वर्गीकरण म्हणून मांडली गेली असे मानले, तरी वारकरी परंपरेतील मान्यवरांच्या मते ती संतसाहित्याच्या मौलिक योगदानाचा अवमान करणारी ठरते. विशेषतः ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या शीर्षकाने आयोजित चर्चासत्रात, त्याच महान संतांच्या साहित्यिक कामगिरीविषयी, सांस्कृतिक अध्यात्मिक आणि धार्मिक योगदानाविषयी, अशी अवमानकारक भूमिका मांडली जाणे, पूर्णपणे चुकीचे आहे. ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम यांच्या वाङ्मयाचा मराठी घराघरात, वैष्णव परंपरेत आणि वारकरी भक्तिसंस्कृतीत असलेला भावनिक आणि आध्यात्मिक दर्जा लक्षात घेता, त्यांच्या ग्रंथरूपांविषयीची ही विचित्र मांडणी माझ्यासह अनेकांना अस्वस्थ करणारी ठरली.

या गोविंदगिरी यांच्या या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायातील विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कीर्तनकार, प्रवचनकार आणि अभ्यासकांनी सार्वजनिक व्यासपीठांवरून प्रतिवाद नोंदविला. त्यांच्या मते, भाष्य असो किंवा संकलन, या साहित्यरूपांची आध्यात्मिक मौलिकता कमी होत नाही; उलट मराठी भक्तिसाहित्यातील लोकाभिमुखता आणि अनुभवप्रधानता याच रूपांमधून प्रकट होते. ज्या “ज्ञानेश्वरी”ला आज, अयोध्येच्या राम मंदिरामुळे मोठे झालेले गोविंदगिरी महाराज, स्वतंत्र ग्रंथ मानायला तयार नाहीत. पण दहा वर्षांपूर्वी त्यांनी काशीत केलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सुरुवातीला, ज्ञानेश्वरी हा जगातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. असे प्रतिपदान केले होते. तो व्हिडीओ मी इथे सोबत जोडला आहे. तर असे हे काळानुसार बदललेले गोविंदगिरीजी, आमच्या ज्ञानोबा – तुकोबांबद्दल काहीही बोलले तरी, त्यांचे मराठी मनांमध्ये असणारे अढळ स्थान तसेच राहणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. “ज्ञानियांचा एका आणि नामयांचा तुका” या मजबूत परंपरेवर अवघा वारकरी संप्रदाय उभा आहे. आजही महाराष्ट्राच्या, लगतच्या पाच, सहा राज्यातल्या लाखो घरांमध्ये, हजारो मंदिरांमध्ये, दररोज, हरिपाठ आणि अभंगांचा नाद घुमत असतो. सध्या जागोजागी हरिनाम सप्ते सुरु आहेत. जिथे ज्ञान ,भक्ती आणि अध्यात्म यावर बोलले , ऐकले जाते. या सगळ्या भक्ती प्रवाहात आजवर रामदास स्वामी यांची विचारधारा समाविष्ट झालेली नाही. त्याची अनंत कारणे आहेत. हे ठाऊक असताना, गोविंदगिरी जी , पुण्यात येऊन, चुकीची तुलना करतात. ते करताना ज्ञानेश्वर माउलींचा, उच्च अध्यात्मिक अनुभूतीची चर्चा करणारा “अमृतानुभव” हा महान ग्रंथ अनुल्लेखाने बाजूला सारतात. त्याशिवाय, एकनाथ महाराज यांच्या अफाट साहित्यिक योगदानाला बाजूला ढकलून, जगप्रसिद्ध तत्वज्ञ कवी संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या “गाथा” केवळ संकलन म्हणून संबोधतात. आणि ते करताना दासबोध किती श्रेष्ठ म्हणून हात उंचावून बोलतात. हे महाराष्ट्रातील लोकांना पटणार नाही.

वारकरी परंपरेत ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा या केवळ साहित्यप्रकार नसून, साधना आणि समाजजागृतीचे जिवंत आधार आहेत. आजही ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा हे लाखो लोकांच्या नित्यपठणातील ग्रंथ आहेत. आधुनिक भाषेत सांगायचे तर, हे दोन्ही ग्रंथ, शेकडो वर्षांपासून आजही “बेस्टसेलर” आहेत. आजही अनेक विद्यापीठातून, दरवर्षी असंख्य विद्यार्थ्यांना, केवळ या ज्ञानोबा -तुकोबांच्या ग्रंथ अभ्यासाने, डॉक्टरेट, आचार्य पदवी मिळते. दर महिन्याला, या वारकरी संतांच्या साहित्याच्या आधारे शेकडो नवीन ग्रंथ निर्माण होत असतात. त्यामुळे “स्वतंत्र ग्रंथ” या निकषावर त्यांचे स्थान कमी करणार्यांनी, ज्ञानेश्वर महाराज यांची ‘वाङ्‌मयी श्रीमूर्ती’ म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा, असा उघड अवमान करायला नको होता. असे मनापासून सांगावेसे वाटते.

वाढत्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर, स्वामी गोविंददेवगिरी यांनी अपुरे स्पष्टीकरण देत माफी मागितली, हे एका अर्थाने बरे झाले. पण गेल्या दोन अडीच दशकांपासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राला ज्या वादाचे ग्रहण लागले होते. तो काही काळ शांत झालेला, समाजात दुही माजवणारा जातीय वाद, गोविंदगिरी जी यांच्या या वक्तव्याने पुन्हा जिवंत झाला आहे. त्याचे वाईट वाटते. याआधी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला , राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना, यामुळे वादग्रस्त ठरलेल्या, संभाजी ब्रिगेड या आक्रमक मराठा संघटनेने खूप पूर्वीपासून समर्थ रामदास स्वामी यांच्या तात्विक आणि सैद्धांतिक भूमिकेविषयी आक्षेप घेतले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील गुरु–शिष्य नात्याबाबत त्यांनी भिन्न ऐतिहासिक भूमिका मांडली आहे.आणि सप्रमाण सिद्ध केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वामी गोविंदगिरी यांनी, नव्याने, संतपरंपरेतील ग्रंथस्वरूपाबाबतची,केलेली मांडणी काहींना वैचारिक ध्रुवीकरण वाढवणारी वाटत आहे. परिणामी, साहित्यप्रकारांच्या नावाने सुरु झालेला हा वाद आता, “गोविंदकृपे”ने परंपराभिमानावर भर देणारा सार्वजनिक वादाचा मुद्दा बनला आहे. तो चिघळू नये यासाठी, वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी पुढे येणे आवश्यक आहे.
आज राष्ट्रीय पातळीवर जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख होतो, तेव्हा, प्रत्येक वेळी महाराष्ट्राने समाज सुधारण्यासाठी, परकीय आक्रमण रोखण्यासाठी, राष्ट्रीय राजकारण पुढे नेण्यासाठी केलेल्या कामाचा उल्लेख होतो. पण या सगळ्या पुरोगामी महाराष्ट्राला बंडखोर संत विचारांची पार्श्वभूमी आहे, याचा मात्र सोईस्कर विसर पडतो.
तेराव्या शतकातील मंत्रतंत्र, कर्मकांड आणि भयंकर रूढी-परंपरेने भारलेल्या, भरकटलेल्या समाजाला ज्ञानदेव-नामदेवादिक संतांनी ज्ञान मार्ग दाखवला होता. जातीपातीत विखुरलेल्या लोकांना पंढरपूरात एकत्र आणण्यासाठी नामदेवांनी जे “सोशल इंजिनीअरिंग” केले होते, ते महाराष्ट्रात अठरा पगड जातीतील संतांच्या अभंगातून प्रतिबिंबित झालेले दिसते. मुख्य म्हणजे, या प्रयोगाचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तर तो गोविंद गिरी महाराज हल्ली जिथे असतात, त्या उत्तर भारतात अध्यात्मिक लाट घेऊन गेला. यामधून प्रेरणा घेऊन, पुढे संत कबीर महाराज, गुरू श्री नानक देव, संत रोहिदास, संत मीरा बाई असे एकापेक्षा एक महान संत, विचारवंत पुढे आले आणि जग सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी बोलत राहिले. भांडत राहिले. कारण, अनुभवाच्या कसोटीवर घासलेले जीवनाचे तत्वज्ञान सहजसोप्या शब्दात सांगणारे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, हे मराठी समाजाचे विचार वैभव, देशाला वैचारिक भान देणारे ठरले होते. गोविंद गिरी जी यांनी आपल्या भाषणापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केला असता, तर हे लिहायची वेळ आली नसती. खरे सांगायचे तर यानिमित्ताने वारकरी संप्रदायातील निद्रिस्त लोकांना, स्वामी गोविंद गिरी यांचा राग येण्याऐवजी, खडबडून जाग यावी आणि पुन्हा एकदा ग्यानबा – तुकारामाच्या भक्तिमय गजरात, आपले वैचारिक मंथन सुरु व्हावे, एव्हढीच अपेक्षा.

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *