साधे बोलणे, सहज संवाद असो किंवा सोशल मीडियावर दिलेल्या आक्रमक प्रतिक्रिया, शाब्दिक भोसका-भोसकी हे आज आपल्या देशातील रोजचं वास्तव बनले आहे आणि दुर्दैवाने, त्या टोकदार शब्दांना आता, प्रत्यक्ष धारदार शस्त्रांची साथ मिळू लागली आहे.
मग अगदी साध्या वादातून रक्तरंजित हाणामाऱ्या होण्यापर्यंत मजल गेली तर दोष कोणाला देणार?
अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत, सोशल मीडियावर सुरू असलेली टोमणेबाजी, वाद, उपहास आणि शिवराळ भाषा, आता रस्त्यावर, रेल्वेत, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी उतरू लागली आहे. लोकांमध्ये असहिष्णुता इतकी वाढली आहे की क्षणभराचा मतभेदही थेट हमरी-तुमरीपर्यंत, आणि काही वेळा जीवघेण्या हिंसेपर्यंत पोहोचतो.
काल रेल्वेतून उतरताना झालेल्या अगदी किरकोळ वादातून एका प्राध्यापकाचा चाकूने भोसकून खून होतो, ही घटना केवळ गुन्हेगारीची बातमी नाही; ती समाजाच्या मानसिक अवस्थेचे भेसूर चित्र दाखवणारी दुःखदायक घटना आहे.
या घटनेत अधिक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे आरोपी एखादा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, उडाणटप्पू किंवा समाजाने बाहेर ढकललेला व्यक्ती नव्हता, तर तोही नोकरीपेशावाला होता, हे आता वृत्तपत्रांतून समजते. म्हणजेच शिक्षण, नोकरी, सामाजिक चौकट असूनही एका क्षुल्लक कारणावरून थेट भोसकण्यापर्यंत जाण्याची मानसिक उडी त्याने घेतली. पोटात धारदार शस्त्र घुसवले की, आतल्या नाजूक अवयवांना गंभीर इजा होते, रक्तस्राव होतो आणि माणूस दगावू शकतो, ही जाणीव नसलेला तो अडाणी माणुस नव्हता. तरीही त्या क्षणी विवेक, संवेदना आणि परिणामांची जाणीव सगळंच मागे पडलं आणि रागाने पूर्णपणे ताबा घेतला. हा राग एका क्षणात निर्माण झालेला नसून, तो आतमध्ये साठत गेलेला, पोसला गेलेला आणि समाजाने नकळत स्वीकारलेला असावा का, त्याला विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे बळ मिळाले असेल का, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो.
आजचा समाज सतत तणावाखाली आहे. आर्थिक असुरक्षितता, कामाचा ताण, स्पर्धा, अपमानाची भीती, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा दबाव आणि त्यावर उतारा म्हणून मिळणारे आभासी संतापाचे व्यासपीठ, हे सगळे घटक माणसाच्या आतल्या संयमाला मागे हटकत चालले आहेत. सोशल मीडियावर विरोधी मत दिसले की अनेकजण ज्या भाषेत टिप्पणी करतात, ती भाषा केवळ शब्दांची नसते, तर सुप्त हिंसेची असते. जणू समोरची व्यक्ती प्रत्यक्षात असती, तर हातात शब्द नसून शस्त्रच आले असते, असा आभास त्या प्रतिक्रिया मधुन निर्माण होतो. या आभासी आक्रमकतेला सतत मिळणारी दाद, लाइक्स आणि शेअर्स, या हिंसेला लोकमान्य, काही प्रसंगी राजमान्य बनवत आहेत… ही चिंतेची बाब आहे.
संयतपणे प्रतिक्रिया देणे, वादविवाद करणार्यांना शांतपणे दूर सारणे, मतभेद नोंदवणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि प्रसंगातून माघार घेणे, या क्षमता आपण हळूहळू गमावत चाललो आहोत का, हा प्रश्न अस्वस्थ करतो. पूर्वी वाद झाले तरी मधे थांबवणारे शब्द, नजरेतला इशारा किंवा समाजाचा दबाव कामी येत असे. आज मात्र ‘मी काय करतोय’ यापेक्षा ‘मी काय सहन करत नाही’ हेच महत्त्वाचे ठरत चालले आहे. व्यक्तिगत अपमानाला राष्ट्रीय, जातीय, वैचारिक किंवा अहंकाराच्या पातळीवर नेण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
रेल्वेतील त्या घटनेत त्या हिंसक क्षणाने दोन आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत. एकाचा जीव गेला, तर दुसऱ्याचे आयुष्य पोलीस चौकशी, तुरुंगात आणि पश्चात्तापात जाणार.
तुम्ही आणि मी, आपण सारे, समाज म्हणून आपण या दोन्हींची जबाबदारी नाकारू शकतो का? हिंसा, भडकपणा, उग्रपणा, अनियंत्रितपणा आणि सततचा प्रक्षोभ यांचा हा अतिमारा केवळ काही व्यक्तींचा दोष म्हणून झटकून टाकता येणार नाही. तो आपल्या सामूहिक मानसिकतेचा भाग बनत चालला आहे, हीच खरी चिंता आहे.
आज प्रत्येक किरकोळ वादात चाकू बाहेर येतो आहे, ही बाब काळजी वाटावी अशीच नाही, तर धोक्याची घंटा आहे. प्रश्न हा नाही की कोण दोषी आहे, तर प्रश्न हा आहे की आपण असा समाज कधी आणि कसा बनलो, जिथे शब्द थांबतात आणि वार सुरू होतात. उत्तर शोधण्याची वेळ आता निघून गेली आहे; आत्मपरीक्षणाची वेळ मात्र समोर उभी आहे…
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply