राज्यात आज दुपारी (सोमवारी) 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात 91.88 विद्यार्थी पास झाले असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. यावर्षी पासिंग टक्केवारी थोडीशी घसरून ९१.८८% वर आली आहे. मागील वर्षीच्या ९३.३७% उत्तीर्णतेच्या टक्केवारीच्या तुलनेत, या वर्षीच्या निकालात १.४९% ची घट दिसून आली आहे.आज जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात विज्ञान शाखेत सर्वाधिक ९७.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतून ९२.६८ टक्के, व्यावसायिक शाखेतून ८३.२६ टक्के आणि कला शाखेतून ८०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्र बोर्डाच्या खालीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा आणि निकाल पहा
www.mahahsscboard.in
www.mahresult.nic.in
www.mahahsscboard.org www.hscresult.mkcl.org
विभागनिहाय निकाल
पुणे – 91.32%
नागपूर – 90.52%
संभाजीनगर – 92.24%
मुंबई – 92.93%
कोल्हापूर – 93.64%
अमरावती – 91.43%
नाशिक – 91.31%
लातूर – 89.46%
कोकण – 96.74%
या निकालात ७५ टक्के आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,४९,९३२ इतकी आहे. ६० ते ७४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,०७,४३८ इतकी आहे. तर ४५ ते ५९.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५८०९०२ इतकी आहे.आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असूनही त्यांना श्रेणीसुधार करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या तीन परीक्षा, अर्थात जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ या तिन्ही वेळी किंवा त्यापैकी एका परीक्षेला बसण्याची संधी असेल.
या परीक्षांमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्याचे गुण वाढल्यास किंवा कमी झाल्यास आधीची गुणपत्रिका कायम ठेवायची की नव्याने उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार विद्यार्थ्याला असेल. त्यासाठी विद्यार्थ्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. यानंतर दुसरी गुणपत्रिका विद्यार्थ्याने मंडळाकडे परत द्यायची आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जुलै २०२४ पासून हे बदल करण्यात आले आहेत.
शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांनी म्हटले की, “इयत्ता बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रवासातील एक पायरी नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्वप्नांच्या दिशेने नेणारा एक निर्णायक क्षण आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!”


Leave a Reply