शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मंजुरी

मुंबई : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा ते सांगली या टप्प्याला राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असून, पुढील टप्प्यांच्या अधिसूचना देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.

याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कागल, करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, भुदरगड आणि आजरा तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर हा बदल करण्यात आला. परिणामी कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्य सरकारने आता वर्धा ते सांगली मार्गास मंजुरी देऊन प्रस्तावित आराखड्याला हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अहवालावर आधारित हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, एमएसआरडीसीने वर्धा ते सांगलीदरम्यानच्या १७० पैकी १५० गावांतील जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण केली असून उर्वरित गावांची मोजणी युद्धपातळीवर सुरू आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर भू-संपादनाची अधिसूचना काढण्यात येईल. या महामार्गाची एकूण लांबी ७०२ किमी असून तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर-गोवा प्रवासाचा कालावधी २१ तासांवरून थेट आठ तासांवर येणार आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *