नवी दिल्ली: ‘आई’ या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक करण्याची गरज असून, सामाजिक कल्याण योजना आणि पेन्शनमध्ये सावत्र आईचाही समावेश केला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. केंद्र सरकार आणि भारतीय हवाई दलाला आवाहन करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोतिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, अनेकदा सावत्र आई मुलाचा सांभाळ आपल्या आईप्रमाणेच करते, त्यामुळे तिला ‘डी-फॅक्टो मदर’ (प्रत्यक्ष आई) मानले पाहिजे. जर मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याची आई वारली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले, तर सावत्र आईच त्या मुलाचा आयुष्यभर सांभाळ करते.अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत तिला सावत्र आई म्हटले जात असले, तरी तीच त्या मुलाची खरी आई असते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हवाई दलाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
सर्वोच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली होती. तिचा मुलगा हवाई दलात असताना निधन पावला होता आणि तिने पेन्शनची मागणी केली होती. मात्र, भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार ‘आई’च्या व्याख्यात सावत्र आईचा समावेश होत नाही. त्यामुळे हवाई दलाच्या वकिलांनी पेन्शन देण्यास नकार दिला. यावर न्यायालयाने हवाई दलाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आई’ हा शब्द खूप मोठा आहे. केवळ जन्म देणारीच आई मुलाचा सांभाळ करते असे नाही. आजकाल अनेकदा सावत्र आईच मुलाचा सांभाळ करते. त्यामुळे पेन्शन किंवा इतर कोणत्याही फायद्यासाठी सावत्र आईच्या दाव्याचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा आणि नियमांमध्ये बदल करायला हवा. यावर केंद्र सरकार आणि हवाई दलाला सर्वाधिक भूमिका घेण्याचे आवाहन न्यायालयाने केले आहे. या प्रकरणात पुढे काय निर्णय येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply