मुंबई : गेल्या तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज (२० जून २०२५) जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी ५० निर्देशांक ३१९ अंकांनी वाढून २५,००० च्या वर पोहोचला, तर सेन्सेक्समध्ये १०४६ अंकांची विक्रमी वाढ नोंदवत तो ८२,४०८ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही लक्षणीय वाढ झाली. या तेजीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत.
तेजीची प्रमुख कारणे
* आरबीआयचा सकारात्मक निर्णय: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) प्रोजेक्ट फंडिंगसाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याने आर्थिक क्षेत्रात मोठी वाढ दिसून आली. बँका, एनबीएफसी आणि सहकारी बँकांसाठीचे नियम सोपे केल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
* अमेरिकेच्या व्याजदरात कपातीचे संकेत: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २०२५ मध्ये व्याजदरात दोनदा कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर महागाई कमी होण्याची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
* कमजोर अमेरिकन डॉलर: अमेरिकन डॉलर निर्देशांक ०.३४ टक्क्यांनी घसरून ९८.५७ वर आला आहे. डॉलर कमकुवत झाल्याने आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केल्याने भारतीय रुपया मजबूत झाला, ज्यामुळे बाजारातील इक्विटीला प्रोत्साहन मिळाले.
* विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) गेल्या दोन सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारातून १८२४ कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली आहे. याशिवाय, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग १२ व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत २५६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
या तेजीमुळे निफ्टी बँक, वित्तीय सेवा, ऑटो आणि मेटल क्षेत्रातील स्टॉकधारकांना चांगला नफा मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य ५ लाख कोटींनी वाढून ४४७.८१ लाख कोटी रुपये झाले. आज BEML (१०%), Kfin tech (५%), IFCI (४.२८%), मॅक्स हेल्थकेअर (३.२८%), आणि IRDAI (४%) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असल्याने शेअर बाजारातील ही तेजी किती काळ टिकेल, याबाबत मात्र काहीशी साशंकता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply