डोंबिवलीतील कचोरे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक

डोंबिवली : डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील वीर सावरकर नगरमधील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ३५ बालकांसाठी विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात व्यक्तींनी या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक केली. याप्रकरणी कचोरे शाखेचे चालक संजू चौधरी यांच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर शिबिरात कचोरे आणि ठाकुर्ली परिसरातील सुमारे ३५ मुले प्रशिक्षक पवन कुमार यांच्याकडून विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत आहेत.

मागील महिनाभरापासून वीर सावरकर नगरमधील चौधरी वाडी मैदानात हा उपक्रम सुरू आहे. याआधीही एक-दोन वेळा प्रशिक्षण दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली होती, परंतु तेव्हा ती चुकून घडली असावी, असे मानून दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री, जेव्हा स्वयंसेवक मुले मैदानात लाठी-काठी आणि अन्य मैदानी खेळांमध्ये व्यस्त होती, तेव्हा अचानक झाडाझुडपांतून त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. सुरुवातीला हा प्रकार चुकून झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. पण दगडफेक वाढल्यानंतर हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

यामुळे संजू चौधरी आणि पवन कुमार यांनी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेळ थांबवले आणि तत्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार कदम यांनी सांगितले;कचोरे येथील मैदानात स्वयंसेवक प्रशिक्षण घेत असताना अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, अशी तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील विविध संघ शाखांमधील स्वयंसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, संबंधित अज्ञात आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कचोरे भागात बंदोबस्त वाढवला आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी दिवाळीच्या काळात देखील या परिसरात अशा प्रकारच्या दहशतीच्या घटना घडल्या होत्या.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *