संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता मस्साजोगकडे अचानक धाव घेतल्याने बीड जिल्ह्यातील पोलीस व प्रशासन यंत्रणेत खळबळ उडाली. माजलगाव आणि धारूर येथील सभा संपवून ते थेट हेलिपॅडकडे जाणार असल्याची अधिकृत माहिती होती. मात्र सभेनंतर त्यांनी नियोजित कार्यक्रम बदलत ताफ्यासह मस्साजोगकडे वळण्याचा निर्णय घेतला.
सकाळपासूनच संतोष देशमुख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोठी गर्दी उसळली होती. याच दरम्यान अजित पवार बीडमध्ये असल्याने त्यांनी अचानक भेट देत कुटुंबीयांना सांत्वन केले. त्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी काही काळ संवाद साधला. भेटीदरम्यान नवाब मलिक हेही उपस्थित होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील उल्लेख झाला होता. आरोपानंतर मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. घटनेनंतर अनेक नेते मस्साजोगला भेट देण्यासाठी गेले होते. आज हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांनी सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम भूमिका घेतली नव्हती, परंतु परिस्थिती चिघळल्याने त्यांनी अखेर राजीनामा दिला. सध्या मुंडे परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली होती. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केल्याने वातावरण आणखी तापले आहे. अजित पवारांची ही अनपेक्षित भेट राजकीय दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.


Leave a Reply