मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या चर्चाना आता पूर्णविराम मिळाले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. “आमच्याकडे असा कोणता ही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर तशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवत नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर शिवेसना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र त्यानंतर आता “आमच्याकडे असा कोणता ही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर तशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवत नाही” असं म्हणत सुनील तटकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.


Leave a Reply