यवतमाळ / अमरावती : राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यापक तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात अनेक रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही औषधे स्थानिक पातळीवरील चिल्लर विक्रेत्यांमार्फत खरेदी करण्यात आली होती.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहवालानुसार, उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेशसह काही परराज्यातील कंपन्यांचे औषध नमुने बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये स्टिपन फार्मास्युटिकल्स, रिप्यूट फार्मा प्रा. लि., बायोटेक फार्मास्युटिकल्स, मॅटलॅब बायोसायन्सेस, कॅम्प्युर लॅबोरेटरीज यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या औषधांची खरेदी शासनाच्या ई-निविदा प्रक्रियेद्वारे झाली असून, तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी तब्बल १५ नमुने बनावट निघाले आहेत.
बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या काही स्थानिक विक्रेत्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यात जया ट्रेडर्स, विशाल ट्रेडर्स, श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, ओंकार फार्मा, गणेश एजन्सी आदींचा समावेश आहे. विभागाने या सर्व विक्रेत्यांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा आयुक्तालयाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना सतर्कतेचा इशारा देत औषध खरेदी करताना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बनावट औषधांच्या लेबलांवर चुकीची माहिती देऊन पुरवठा करण्यात आल्याचेही आढळले आहे. या औषधांचे मूळ ठिकाण आणि उत्पादक कंपन्यांचा मागोवा घेण्यासाठी विभागाने विशेष पथके नेमली आहेत. राज्यभरात याबाबत तपास आणि चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.
Leave a Reply