सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुडधेंची याचिका फेटाळली

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कॉंग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी धक्कादायक फटका दिला. गुडधे यांनी फडणवीस यांच्या निवडणुकीत मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ग्राह्य न धरता थेट फेटाळून टाकली.

गुडधे यांनी फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेक वेळा केला होता. नागपूर उच्च न्यायालयाने देखील त्यांच्या अशाच प्रकारच्या याचिकेला आधीच नकार दिला होता. या निकालाविरोधात गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्वाई यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गुडधे यांच्या आरोपांना कोणताही ठोस आधार नसल्याचे स्पष्ट केले. मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे पुरावे सादर करण्यात गुडधे अपयशी ठरले, असेही न्यायालयाने नमूद केले.

निवडणूक पारदर्शक आणि विधीमान्य पद्धतीने पार पडली असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत, गुडधे यांचा दावा फेटाळून लावला. या निर्णयामुळे गुडधे यांना मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांना महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. सतत न्यायालयीन लढाईत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप भाजपकडून वेळोवेळी केला जात होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही भूमिका अधिक बळकट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निर्णयानंतर फडणवीस यांच्या मतदारसंघातील वादाला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. राज्यातील राजकीय वातावरणात यामुळे नव्या चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *