नागपूरचा गौरवशाली वारसाः रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावासाठी सज्ज

नागपूरचे भोसले राजघराणे उभारणारे मराठा सेनापती श्रीमंत रघुजी भोसले प्रथम यांच्याशी संबंधित एक दुर्मीळ आणि ऐतिहासिक तलवार २९ एप्रिल २०२५ रोजी लंडनमधील ‘सोथेबीज’ लिलावगृहात लिलावासाठी मांडली जाणार आहे. ‘स्प्लेंडर: द फिलिप मिसिलियर कलेक्शन ऑफ इस्लामिक आर्म्स अँड आर्मर’ या विशेष प्रदर्शनाचा भाग असलेल्या या तलवारीची अंदाजित किंमत ६६,००० ते ६८,००० पाउंड्स (सुमारे ₹६.३ ते ₹८.४ लाख) दरम्यान असण्याचा अंदाज आहे. ही तलवार १८व्या शतकातील असून तिचे संपूर्ण नाव ‘बास्केट-हिल्ट तलवार (खंडा) – रघुजी भोसले, नागपूर राज्य, मध्य भारत’ असे नमूद करण्यात आले आहे. तलवारीवर देवनागरी लिपीत कोरलेला शिलालेख आहे, जो रघुजी भोसले प्रथम यांच्यासाठी ती विशेषतः तयार करण्यात आली असल्याचे स्पष्ट करतो. रघुजी भोसले हे मध्य भारतात मराठा साम्राज्य विस्ताराचे एक महत्त्वाचे नेतृत्व होते.

या तलवारीचे वैशिष्ट्य म्हणजे युरोपियन पात्यांच्या धर्तीवर तयार केलेले तिचे सरळ व लांब पाते, जे त्या काळातील भारतीय राजदरबारातील युरोपियन शस्त्रास्त्रांवरील आकर्षण दर्शवते. ‘सोथेबीज’च्या माहितीनुसार, भारतीय राजदरबारात युरोपियन धाटणीच्या पात्यांना विशेष मान होता आणि अशा तलवारींना “फिरंगी” असे संबोधले जात होते.

इतिहासातील उल्लेखानुसार, सम्राट जहांगीरकडेही जर्मन पात्यांचे शेकडो तलवारींचा संग्रह होता. ही तलवार त्याच आंतरसंस्कृती सौंदर्याचे प्रतीक असून सोलिंगेन, व्हेनिस व जेनोआ येथील पात्यांसारखी बनावट असूनही तिला भारतीय रचनाशैलीचे खास वैशिष्ट्य लाभले आहे. लिलावानंतर ही तलवार ‘ग्रीनफोर्ड पार्क वेअरहाऊस’ येथे हलवली जाईल आणि ४८ तासांच्या आत ताब्यात घेता येईल.

दयाद कन्सल्टन्सीजच्या संस्थापक आणि शस्त्रास्त्र संशोधक गिरिजा दुधाट यांनी स्पष्ट केले की खंडा हा तलवारीचा भारतीय मूळ प्रकार असून तो मुख्यतः कापण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले की, “खंडा प्रकाराच्या तलवारीत भारतीय शैलीतील टोपलीसारखा हंडा असतो आणि लांब व दुधारी पाते असते. राजपूत, शीख व मराठा योद्धे या तलवारी विशेष पसंत करीत.” यावेळी त्यांनी नमूद केले की नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयातही अशा प्रकारच्या तलवारी आहेत, मात्र लिलावासाठी ठेवलेल्या तलवारीवर जसे सुवर्ण नक्षीकाम आणि जडणघडण आहे, तसे वैशिष्ट्य अन्य तलवारींमध्ये नाही. त्यामुळे ही तलवार औपचारिक प्रसंगी वापरण्यासाठी तयार केली गेली असावी.

राजे मुधोजी भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही ऐतिहासिक तलवार नागपूरमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १८५३-१८६४ दरम्यान आमच्या भोसले घराण्याची तिजोरी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लुटली होती आणि अनेक मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या होत्या. कदाचित त्याच काळात ही तलवारही परदेशात गेली असावी.” त्यांनी सांगितले की नागपूरच्या नागरिकांच्या इच्छेनुसार ही तलवार परत आणण्यासाठी वैयक्तिकरित्या प्रयत्नशील आहेत. या ऐतिहासिक तलवारीच्या पुनर्भेटीमुळे नागपूरच्या समृद्ध वारशाला नवी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *