कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याने कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बंगळुरू येथे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “मी या पदावर कायम राहू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत… आता इतर नेत्यांनाही संधी दिली पाहिजे.” मात्र त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की नेतृत्वातून ते दूर जाणार नाहीत.
शिवकुमारांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील जुना वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणण्यात शिवकुमार यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रबळ दावेदार होते. परंतु पक्षातील ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमाचा हवाला देत त्यांचा दावा बाजूला ठेवण्यात आला आणि सिद्धरामय्या यांची निवड झाली. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये ‘रोटेशनल मुख्यमंत्री’ सूत्र ठरल्याची चर्चा अनेकदा पुढे आली आहे. या सूत्रानुसार दोघेही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणार होते. सिद्धरामय्या यांचा पहिला कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत असल्याने शिवकुमार यांच्या वक्तव्याला विशेष राजकीय वजन प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे, सिद्धरामय्या यांनी स्वतःच पुन्हा मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी अलीकडेच १७वा अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा केली, ज्यामुळे नेतृत्वबदलाच्या शक्यता आणखी धूसर झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी १६ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, जर हायकमांडने फेरबदल मंजूर केले तर सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ टिकवतील, अशी चिन्हे आहेत. अशावेळी शिवकुमार यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येऊ शकते.


Leave a Reply