आज भारतीय “#पोलीस_स्मृती_दिन” आहे.
दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाऱ्या पोलीस दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात हुतात्मा झाले अशा जवानांना आजच्या दिवशी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात येते.
“पोलीस” हा शब्द आणि पोलीस प्रशासन भारतात आले तेच मुळी इंग्रजी सत्तेला बळकटी देण्यासाठी. इंग्लंडमध्ये पोलीस हा शब्द पहिल्यांदा पंधराव्या शतकात पोहोचला होता. लॅटीन भाषेत आधी शहरं ( मेट्रोपोलिस) मग शहरातील प्रशासन व्यवस्था (पाॅलीसी) यासाठी वापरला जाणारा हा शब्द आणि त्या सोबतची कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठीची नवी चौकट पुढे रोम, फ्रांस असा प्रवास करत इंग्रजांपर्यंत पोहोचली. दडपशाहीची मानसिकता असलेल्या ब्रिटिशांना ती भावली. तत्कालीन इंग्लंडमध्ये अडाणी, ऊंडगे, रासवट आणि हिंसक लोकांचा भरणा खुप होता. त्यांना वठणीवर आणण्यासाठी नवी पोलीस व्यवस्था पाचशे वर्षांपूर्वी इंग्रजी राजसत्तेने फक्त स्वीकारली नाही तर, नंतरच्या साम्राज्य विस्तार काळात सर्वत्र पसरवली. इंग्रजांनी भारतात याच पोलीसी सामर्थ्याच्या बळावर स्थानिक लोकांवर, स्वातंत्र्य सैनिकांवर अनन्वित अत्याचार केले. पोलीस स्टेशन आणि कोर्ट या दोन्ही ठिकाणी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या क्रूर आणि निष्ठूर लोकांना अधिकारपदावर बसवले. त्यांनी पध्दतशीरपणे भारतीय समाजाचे मानसिक, आर्थिक खच्चीकरण केले. तेव्हापासून आजतागायत पोलीस स्टेशन आणि न्यायालय या दोन्ही परस्पर संलग्न व्यवस्थांचा भारतीय लोकांनी धसका घेतलाय. आज देश स्वतंत्र होऊन पाऊणशे वर्षे होत आली, तरीही “पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये ” ही नकारात्मक भावना बदललेली नाही, हे येथे नमूद करताना खेद होतो…. लोकांना आजही या दोन्ही ठिकाणी जाणे भितीदायक वाटते. म्हणूनच असेल कदाचित, आजच्या दिवशी फक्त पोलीस मुख्यालयात कार्यक्रम होतात,
ज्या दिवशी पोलिसांची कार्यपद्धती लोकांना आपली वाटेल.
ज्या दिवशी पोलिसांना काम करताना “वरून” आदेश येणार नाहीत. ज्या दिवशी पोलिसांना निर्णय बदलासाठी ” बदली”ची धमकी मिळणार नाही….आणि ज्या दिवशी पोलिसांना “सद्गरक्षणाय” चा अर्थ कळेल, तेव्हा पोलीस स्मृती स्मरणासाठी गावागावातील मैदानावर लोकं जमा होतील….
समाज सुरक्षित रहावा यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे समस्त पोलीस बांधव मला वंदनीय आहेत… त्यांना मानाचा मुजरा ! जय हिंद !!!
Please follow and like us:
Leave a Reply