मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून १ कोटी; जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही उचलणार

अहमदाबाद: अहमदाबादजवळ काल (१२ जून २०२५) झालेल्या भीषण विमान अपघातानंतर, एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाने पीडितांसाठी मोठी घोषणा केली आहे. या दुर्घटनेत ज्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे टाटा समूहाने जाहीर केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्हाला एअर इंडिया फ्लाइटच्या या दुःखद अपघातामुळे प्रचंड वेदना झाल्या आहेत. आमची सहानुभूती आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी आहेत.” याशिवाय, या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च टाटा समूह उचलणार आहे. जखमींना आवश्यक ती सर्व काळजी आणि वैद्यकीय सहकार्य मिळेल याची खात्री टाटा समूह देणार आहे.

अपघातात बी.जे. मेडिकल कॉलेजचे वसतिगृह (Hostel) देखील मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा समूह मदत करणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले. टाटा समूहाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, “या संकटसमयी टाटा समूह बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत ठामपणे उभा आहे.”या अपघातात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते, अशी माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत एका ब्रिटिश-भारतीय प्रवाशाशिवाय इतर कोणालाही वाचवता आले नाही, अशीही माहिती काही माध्यमांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *