आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार कालिसेट्टी अप्पलानाइडू यांनी तिसऱ्या अपत्यासाठी अनोखी घोषणा केली आहे. त्यांच्या मते, जर महिलांनी तिसरे मूल जन्माला घातले, तर त्यांना विशेष बक्षीस दिले जाईल— मुलगी झाल्यास ₹५०,००० तर मुलगा झाल्यास गाय भेट दिली जाईल.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अप्पलानाइडू यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि अन्य टीडीपी नेत्यांनीही तरुण लोकसंख्या घटत असल्याचे सांगून ती वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना खासदार अप्पलानाइडू म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढीबाबत आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या अपत्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”
प्रकाशम जिल्ह्यातील मारकापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही मोठी घोषणा केली. यानुसार, बाळंतपणाच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना मुलांची संख्या कितीही असली तरी प्रसूती रजेचा लाभ मिळणार आहे.
राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनीही हीच घोषणा अधिकृतरित्या स्पष्ट केली. याआधी फक्त दोन अपत्यांसाठीच सहा महिन्यांची पूर्ण वेतनासह रजा मिळत होती. मात्र, आता महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्व महिला कर्मचाऱ्यांना कितीही अपत्य असली तरी प्रसूती रजा मिळेल, असे त्यांनी जाहीर केले.
कालिसेट्टी अप्पलानाइडू हे २०२४ लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झालेले खासदार आहेत. ते पूर्वी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते आणि २५ वर्षांपासून टीडीपीमध्ये सक्रिय आहेत.
२००४ मध्ये टीडीपीच्या मानव संसाधन विकास शाखेचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच, उत्तर आंध्र प्रदेशातील टीडीपीच्या प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Leave a Reply