भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे माजी कर्णधार आणि 1983 विश्वचषक विजेता कपिल देव यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यासाठी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाला जबाबदार धरले आहे. कपिल देव यांच्या मते, भारतीय खेळाडू वर्षातील जवळपास दहा महिने क्रिकेट खेळत असल्याने त्यांच्या दुखापती वाढत आहेत. कपिल देव यांनी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) आता खेळाडूंसाठी पुनर्वसन केंद्र बनली आहे असा टोलाही लगावला. ते म्हणाले, “खेळाडू सराव करण्याऐवजी दुखापतीतून सावरण्यासाठी तिथे अधिक वेळ घालवत आहेत. जसप्रीत बुमराह हे याचं ताजं उदाहरण आहे.”
बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्राथमिक संघात निवड झाल्यानंतरही त्याला अंतिम संघातून वगळण्यात आले. दुखापतीमुळे यापूर्वी मोहम्मद शमीलाही तब्बल 14 महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं.
”संघासाठी व्यक्तीपेक्षा संघमहत्त्वाचा” -कपिल देव
दिल्लीतील “टाटा स्टील गोल्फ पुरस्कार” समारंभात कपिल देव यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघावर परिणाम होईल का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “संघाने एकाच खेळाडूवर अवलंबून न राहता, एकमेकांना सहकार्य करायला हवं.” “तो संघातच नाही, मग त्याच्याबाबत चर्चा कशाला? हा संघाचा खेळ आहे. हे बॅडमिंटन, टेनिस किंवा गोल्फ नाही. संघ म्हणून आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहोत, आणि संघ म्हणूनच जिंकायचं आहे!”
कपिल देव पुढे म्हणाले, “मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नयेत, असं आपल्याला नेहमीच वाटतं. पण जर ते झालं, तर आपण त्यावर काही करू शकत नाही. त्यामुळे संघाने आपली मानसिकता मजबूत ठेवली पाहिजे. भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा!”
Leave a Reply