कोल्हापुरातील शिक्षकाला विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे.ही घटना 9 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती. आरोपी शिक्षक महेश नारायण नाजरे (58) पीडित मुलगी
दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी गेली असता त्याने हे कृत्य केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक आहे. गुन्हा घडलेल्या दिवशी आरोपी पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान ती घरी नव्हती. घरी आल्यावर मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या आरोपी शिक्षकाच्या घरी पोहोच करण्यास तिला सांगितले. त्यानुसार ती दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुस्तकाचे झेरॉक्स घेऊन आरोपी नाजरे याच्या घरी गेली.
त्या दरम्यान तो त्याच्या घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत बसला होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेत असतानाच तिने हिसडा देऊन घरी पळून गेली. या प्रकरणी तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. न्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Leave a Reply