वडोदरा येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस डिंपल घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून निवडलेल्या ५१ समाजपरिवर्तकांपैकी घाडगे हे एकमेव पुरस्कार विजेते ठरले. हा सोहळा समन्वय प्रतिष्ठान, वडोदरा यांच्या पुढाकाराने व इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने बनास डेअरी येथे पार पडला.
या प्रसंगी गुजरात विधानसभा अध्यक्ष व बनास डेअरीचे चेअरमन शंकर चौधरी, इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राम माधव, आयएएस अधिकारी एम. नगराजन, माजी शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चूडासमा, तसेच झायडेक्स ग्रुपचे डॉ. अजय रांका उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तेजस घाडगे गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. संस्थापिका मंगलताई शहा व सहसंस्थापक डिंपल घाडगे यांच्या तिसऱ्या पिढीतून ते नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. युवक जनजागृती, आंतरराष्ट्रीय भागीदारी व निधी उभारणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मेडिकल व सायकेट्रिक सोशल वर्कमध्ये मास्टर्स घेतलेल्या तेजस यांनी समुपदेशन, प्रकल्प नेतृत्व या क्षेत्रातही विशेष कामगिरी बजावली आहे.
१९९६ पासून प्रभा हिरा प्रतिष्ठानतर्फे एचआयव्ही / एड्स विषयावर जनजागृती सुरू झाली. २००१ मध्ये दोन एचआयव्हीग्रस्त बालकांपासून पालवी प्रकल्पाची सुरुवात झाली. आज १५० हून अधिक मुलांना व महिलांना सुरक्षित निवास, अन्न, शिक्षण, औषधोपचार व प्रशिक्षण दिले जाते. गेल्या २५ वर्षांत ५००+ लाभार्थींपर्यंत मदत पोहोचली असून, २,८०० मुलांना शिक्षण व ५५ एचआयव्हीग्रस्त जोडप्यांचे विवाह संस्थेमार्फत पार पडले आहेत. पुरस्कार स्विकारताना तेजस म्हणाले, “हा सन्मान माझा नसून पालवीच्या सेवाभावाचा गौरव आहे. महाराष्ट्रासाठी, पंढरपूरसाठी व सर्व देणगीदारांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”
Leave a Reply