तेजस्वी यादव यांच्या ‘बिहार अधिकार’ यात्रेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना विरोधी महाआघाडीने प्रचाराला गती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या १४ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’नंतर आता आरजेडीचे नेते व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव १६ सप्टेंबरपासून ‘बिहार अधिकार यात्रा’स सुरुवात करणार आहेत. ही पाच दिवसांची यात्रा १६ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडणार असून तिचा प्रारंभ जहानाबाद जिल्ह्यातून होईल. २० सप्टेंबर रोजी वैशाली जिल्ह्यात या यात्रेचा समारोप होणार आहे. या काळात यादव एकूण १० जिल्ह्यांतून प्रवास करणार आहेत. त्यामध्ये जहानाबाद, नालंदा, पटना, बेगुसराय, खगडिया, मधेपुरा, सहरसा, सुपौल, समस्तीपूर आणि वैशाली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे ६० विधानसभा मतदारसंघांना ही यात्रा कवेत घेणार आहे.

पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना संबंधित जिल्ह्यांत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात यादव जनसभेला संबोधित करतील तसेच लोकांशी थेट संवाद साधतील, अशी माहिती पक्षाचे नेते रणविजय साहू यांनी दिली. यापूर्वी राहुल गांधींच्या यात्रेत २४ जिल्ह्यांतील ११० विधानसभा मतदारसंघ व्यापले गेले होते. त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर आरजेडी आता उर्वरित भागात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि आरजेडी मिळून मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून निवडणुकीत इंडिया आघाडीची ताकद वाढवण्याचे ध्येय ठेवत आहेत.राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा यात्रांमुळे प्रचाराची रंगत वाढते. मात्र प्रत्यक्ष मतांतरे कितपत होतील हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने तेजस्वी यादवांची ‘बिहार अधिकार यात्रा’ ही महाआघाडीच्या रणनीतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *