हैद्राबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांना नग्न करून परेड करण्याची धमकी दिली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या दोन महिला पत्रकारांच्या अटकेनंतर सीएम रेड्डी यांचे हे विधान आले आहे. ते म्हणाले की, जे स्वतःला पत्रकार म्हणवतात ते लोकप्रतिनिधींविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत आहेत. अशा लोकांना नग्न करून सार्वजनिक ठिकाणी फिरवले जाईल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी, १५ मार्च रोजी विधानसभेत ही प्रतिक्रिया दिली. विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अशा गोष्टी रोखण्यासाठी कायदा केला जाऊ शकतो. यावेळी सीएम रेड्डी म्हणाले, “मी गप्प आहे असे समजू नका. मी मुख्यमंत्री आहे. मी तुम्हाला नग्न करून मारहाण करेन. माझ्या एका ऑर्डरवर तुम्हाला मारहाण करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर येतील. माझ्या पदामुळे मी सहनशील आहे. मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन.” असं मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे प्रकरण?
१० मार्च रोजी एका स्थानिक यूट्यूब न्यूज चॅनेलवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये तो तेलुगूमध्ये अपशब्द वापरत होता आणि रेवंत रेड्डी यांच्या कुटुंबाला आणि काँग्रेस नेत्यांना मारहाण करण्याची धमकी देत होता. १२ मार्च रोजी युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की हा व्हिडिओ बीआरएस कार्यालयातच चित्रित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बीआरएसने पगारी कलाकारांना त्यांच्या कार्यालयात बोलावले, व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, आता पोलिस गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना त्रास होत आहे.
Leave a Reply