अमेरिकेत तेलंगणातील विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या; परत आणण्यासाठी कुटुंबाची सरकारकडे विनंती

डॅलस (अमेरिका) – हैद्राबादचा रहिवासी व 27 वर्षीय भारतीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल याची अमेरिकेतील डॅलस येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री पेट्रोल पंपावर ड्युटीवर असताना घडली. पोलवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रशेखर पोल हा 2023 साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. हैद्राबादमधून बीडीएस पूर्ण केल्यानंतर त्याने अमेरिकेत मास्टर्स केले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो पूर्णवेळ नोकरीच्या शोधात असताना अर्धवेळ पेट्रोल पंपावर काम करत होता.

त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या मित्राच्या पालकांमार्फत कुटुंबाला मिळाली. “सरकारने आमच्या मुलाचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणावे आणि अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,” अशी विनंती त्याची आई सुनिता पोल यांनी केली.

ह्युस्टनमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून चौकशीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोळ यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. “या दुर्दैवी घटनेने मला अतिशय दु:ख झाले आहे. राज्य सरकार चंद्रशेखरच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील,” असे ते म्हणाले.

दरम्यान, बीआरएसचे आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री हरिश राव यांनी पोल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. या घटनेमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही अमेरिकेत तेलंगणातील काही विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *