काशीमिरा │ काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे मुलीच्या छेडछाडीच्या प्रकारानंतर दोन गटांमध्ये झालेल्या झटापटीने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर मंगळवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी हातात दांडके, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २५ पेक्षा जास्त रिक्षांच्या काचा फोडून तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाईचे निर्देश दिले आहेत.
घटनेवर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, “डाचकुल पाडा परिसरात अलीकडे गुन्हेगारी वाढली आहे. येथे बाहेरून आलेले बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोर असण्याची शक्यता आहे. तसेच अमली पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. काल काही लोकांनी इथल्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर परिसरात दहशत माजवली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.


Leave a Reply