सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर शनिवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या आठ पर्यटकांच्या बुडण्याची भीषण घटना घडली. यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला पर्यटक गंभीर जखमी आहे. उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून सुरु आहे.
ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. बेळगाव येथील कित्तूर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कुडाळ येथे जेवण करून शिरोडा समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने आठ जण खोल पाण्यात गेले आणि काही क्षणांतच ते प्रवाहात वाहून गेले. उपस्थित महिलेनं आरडाओरडा करत स्थानिकांना माहिती दिल्यानंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.
स्थानिकांच्या मदतीने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकार्याने चार पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला पर्यटक इसरा इम्रान कित्तूर (१७, रा. लोंढा, बेळगाव) गंभीर अवस्थेत असून तिला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये फरहान इरफान कित्तूर (३४), इबाद इरफान कित्तूर (१३) आणि नमीरा आफताब अख्तर (१६) यांचा समावेश आहे.
बुडालेल्या आणि बेपत्ता पर्यटकांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६), इक्वान इमरान कित्तूर (१५), फरहान मोहम्मद मणियार (२०) आणि जाकीर निसार मणियार (१३) या चार जणांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यटकांच्या निष्काळजीपणासोबतच किनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला असून समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Leave a Reply