मुंबई: हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना, एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा काढणार आहेत. या घोषणेमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे ठाकरे कुटुंबातील राजकीय दरी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भात, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. मनसेने सुरुवातीला दोन स्वतंत्र मोर्चे काढण्याऐवजी, एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला आता ठाकरे गटाने सहमती दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळूंज यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आजपर्यंत दोन्ही भाऊ एकाच मुद्द्यावर, म्हणजे मराठी माणसाच्या प्रश्नांवर भांडत होते,’ असे ते म्हणाले. ‘हिंदी सक्तीविरोधातील हा मोर्चा मराठी माणसासाठी आहे आणि दोन भाऊ पुन्हा एकदा एकत्र व्यासपीठावर येणार आहेत, हे पाहून मला वाटते की मराठी माणसाचा भाग्योदय पुन्हा होत आहे.’
वळूंज पुढे म्हणाले की, ‘ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा, कारण तो मराठी माणसासाठी आहे. पंधरा वर्षे लागली, पण ‘देर आये दुरुस्त आये.’ आता गरज मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे. मतं विभागली गेली आहेत आणि आणखी एक शिवसेना निर्माण झाली आहे.’ पाच जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चाविषयी बोलताना वळूंज यांनी सांगितले की, ‘बाळासाहेब ठाकरेंना नेहमी वाटत होतं की दोन्ही भावांनी एकत्र यावं. बाळासाहेबांना घाबरतच आम्ही ही मोहीम सुरू केली होती.’ बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी दोघांनाही पाण्यापर्यंत नेतोय, आता त्यांनी ते एकत्र प्यायचं आहे.’ या सकारात्मक पावलाचे स्वागत करताना वळूंज यांनी मराठी जनतेला आवाहन केले की, ‘शंका-कुशंका निर्माण करण्याऐवजी, मराठी माणसांनी आपली ताकद दाखवून हा शासन निर्णय मागे घ्यायला लावावा.’ पाच जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चाच्या वेळी भावना उचंबळून येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply