देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक; ५८ कोटींना गंडवले

मुंबई : मुंबईतील ७२ वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटक दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक मानली जात आहे. याआधी २० ते २३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद होती.

तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे व्यावसायिक असून, १९ ऑगस्ट रोजी काही सायबर भामट्यांनी स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे अधिकारी असल्याचे सांगत त्यांना संपर्क साधला. त्यांनी तक्रारदाराविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवली. त्यानंतर त्यांना आभासी अटकेत ठेवत टप्प्याटप्प्याने विविध बोगस खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. काही दिवसांतच वृद्ध दलालाकडून तब्बल ५८ कोटी रुपयांची रक्कम भामट्यांच्या खात्यावर जमा झाली.

या प्रकरणात सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात तिघांच्या खात्यांमध्ये २५ लाख रुपये वर्ग झाल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी अब्दुल नासिर खुल्ली (वय ४७), चिरा बाजार येथील स्टील व्यापारी अर्जुन कडवासरा (वय ५५) आणि त्याचा भाऊ जेठाराम कडवासरा (वय ३५) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांची बँक खाती गोठवली असून, पुढील तपास सुरू आहे.

सायबर गुन्ह्यांचा वाढता वेग आणि भामट्यांच्या अत्याधुनिक पद्धतींमुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या कॉल, ईमेल किंवा मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोणतीही अधिकृत चौकशी असेल तर संबंधित विभागाशी थेट संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *