मोबाईलवर कॉल येताच दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश

दूरसंचार विभागाकडून देशातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच मोबाईलवर कॉल आल्यावर नंबरसोबत कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्यात एका सर्कलमध्ये ही सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधेची 60 दिवस चाचणी घेतल्यानंतर ती देशभर लागू केली जाईल. कंपन्यांना दर आठवड्याला सरकारला प्रगती अहवाल सादर करावा लागेल, ज्यावरून सरकार तांत्रिक अडचणी दूर करणार आहे.

या नव्या Caller ID सेवेच्या माध्यमातून अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत निर्णय घेणे ग्राहकांसाठी अधिक सोपे होणार आहे. सध्या ट्रूकॉलरसारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे ही सुविधा मिळते, पण आता ती थेट मोबाईल नेटवर्कवर उपलब्ध होईल.

दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रासाठी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे व्होडाफोन आयडिया कंपनीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 5,606 कोटी रुपयांच्या एजीआर थकबाकीवर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिल्यामुळे कंपनीच्या अस्तित्वाला बळ मिळणार आहे. ब्रोकरेज फर्म सिटीच्या अहवालानुसार, या निर्णयामुळे व्होडाफोन आयडियाला आंशिक थकबाकी माफी किंवा देयकाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल.

कंपनी सध्या 25,000 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा मिळविण्याच्या प्रक्रियेत असून, या निर्णयामुळे तिच्या इक्विटी वाढीस आणि आर्थिक स्थैर्यास हातभार लागेल. यामुळे सरकारचा वाटा देखील काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *