पालिकांच्या निवडणुकांत युतीचा निर्णय स्थानिक स्तरावर : हर्षवर्धन सकपाळ

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीचा धर्म पाळताना झालेल्या तडजोडींमुळे काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युती व आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने जिल्हा व तालुकास्तरावरील संघटनांना दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली.

कोकण विभागातील महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाली. या बैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, स्थानिक पातळीवरील आगामी निवडणुकांची रणनीती, तसेच पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. या वेळी सकपाळ म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आधारित असलेल्या स्थानिक निवडणुकांत युतीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक संघटनांना देण्यात आला आहे. प्रभाव रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर स्थानिक पातळीवरच युतीबाबत अंतिम भूमिका ठरवली जाईल.

सकपाळ यांनी कबूल केले की, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले वातावरण असूनही युती-आघाडीच्या धर्मामुळे पक्षाचे नुकसान झाले. या अनुभवातून धडा घेत, पुढील निवडणुकांत कार्यकर्त्यांचा सन्मान व स्थानिक मतमतांतरांचा विचार करूनच आघाडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

बैठकीत आगामी स्थानिक निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावरील नेतृत्वाला पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनसंपर्क वाढवणे आणि स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले गेले.

यावेळी उद्धवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र, सकपाळ यांनी अप्रत्यक्षपणे आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना वाव मिळाला आहे. कोकणातील काँग्रेसने या पार्श्वभूमीवर स्थानिक निवडणुकांत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *