‘छावा’ची दक्षिणेकडे धडाकेबाज वाटचाल! तेलुगू ट्रेलर प्रदर्शित; विकी कौशल दक्षिणेकडील थिएटर गाजवण्यास सज्ज

ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ हिंदीमध्ये दमदार यश मिळवल्यानंतर आता तेलुगू प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशल यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. याच यशाची पुढील पायरी म्हणून निर्मात्यांनी अधिकृतपणे तेलुगू आवृत्तीच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

नुकताच या चित्रपटाचा तेलुगू ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, काही तासांतच युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
‘छावा’ च्या तेलुगू ट्रेलरचे अनावरण दक्षिणेकडील प्रेक्षकांसाठी सोशल मीडियावर करण्यात आले. निर्मात्यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत म्हटले आहे – “धैर्य आणि वैभवाचे भव्य दृश्य आता तेलुगूमध्ये!” ७ मार्च २०२५ रोजी ‘छावा’ तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये दमदार संवादांसह तेलुगू भाषेतील गाण्यांची झलकही पाहायला मिळते.

हिंदीमध्ये ‘छावा’ ने प्रेक्षकांची मने जिंकत तगडी कमाई केली आहे. तिसऱ्या शनिवारी (१ मार्च २०२५) या चित्रपटाने २२ कोटी रुपयांची कमाई केली, तर तिसऱ्या रविवारी (२ मार्च) हा आकडा २४.२५ कोटींवर पोहोचला. सोमवारी (३ मार्च) १.८२ कोटींची कमाई झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४६०.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आता तेलुगू आवृत्ती प्रदर्शित झाल्यानंतर या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. रश्मिकाचा दक्षिणेकडील मोठा चाहतावर्ग लक्षात घेतल्यास तेलुगू प्रदर्शनानंतर ‘छावा’ ला आणखी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
तेलुगू भाषेतील वितरणाची जबाबदारी टॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस ‘गीता आर्ट्स’ यांच्याकडे आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील प्रमुख थिएटरमध्ये हा चित्रपट झळकणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ‘छावा’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना, आता तेलुगू रिलीजनंतर चित्रपटाच्या कमाईत किती वाढ होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *