मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने विधिमंडळाची प्रतिमा गंभीरपणे मलिन झाली आहे. या घटनेवर शुक्रवारी (१८ जुलै रोजी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात भाष्य केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याचा संबंध अध्यक्षांच्या प्रस्तावाशी नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांकडून या घटनेवर सुरू असलेल्या खळखळीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. “अशा घटनांमुळे केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदारांची प्रतिष्ठा खराब होत आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. बाहेर समाजात अशा घटनांमुळे संपूर्ण आमदार समाजाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत,” असे ते म्हणाले. अशा घटनांचे राजकारण न करता, त्यांचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना केले.
या घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले की, या घटनेशी त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. ते सभागृहात असताना ही घटना घडली असून, त्यांनी कोणालाही चिथावणी दिली नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. लोकशाहीच्या या मंदिरात घडलेली ही घटना चुकीची असून, त्याबद्दल त्यांना वाईट वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे विधिमंडळाच्या कामकाजावर आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply