मुंबई – महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, सामान्य जनता आणि लाडक्या बहिणींचे विशेष लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार राज्याच्या विकासासाठी कुठली मोठी आणि ठोस घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकांदरम्यान लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. आता ते अर्थसंकल्पात मांडले जाते का? याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानात तीन हजाराने वाढ केली जाणार असल्याची घोषणा याआदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याची देखील घोषणा आज अजित पवार करू शकतात. पूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 12 हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून मिळायचे. आता त्यात तीन हजार रुपये वाढवून प्रतिवर्षी 15 हजार रुपये देऊ, असे फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, विरोधकांनी या अर्थसंकल्पातून आपल्याला काय अपेक्षित आहे, हे सांगण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत–जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत अर्थसंकल्पातून त्यांना असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
अर्थसंकल्पातून रोहित पवारांच्या अपेक्षा :
लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रु.
महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांची पोलीस भरती.
शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15 हजार रु.
MSP वर 20 टक्के अनुदान.
वृद्धांना महिन्याला 1500 रुपये वरून 2500 रुपये.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रु. मानधन आणि विमा संरक्षण.
10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती.
Leave a Reply