पुणे : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज 1 वाजता निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) हे जाहीर केले आहे. 94.10 टक्के निकाल लागला असून कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुली नेहमीप्रमाणे निकालात सरस ठरल्या आहेत. यावर्षी एसएससी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी mahresult.nic.in,
sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in
आणि results.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाइटना भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
याशिवाय, एसएससीचे विद्यार्थी डिजीलॉकर किंवा एसएमएसद्वारे देखील त्यांचे निकाल तपासू शकतात. एसएमएसद्वारे निकाल मिळविण्यासाठी, विद्यार्थ्याने MHSSC सीट नंबर टाइप करावा आणि तो 57766 वर पाठवावा. स्कोअरकार्ड संदेश मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये अलर्ट म्हणून येईल. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळांमधून मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. तर २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. यातील ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला आहे, असे शरद गोसावी यांनी म्हटले.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थी बसले. १४ लाख ८७ हजार ३९९ विद्यार्थी पास झाले आहे. त्यांची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे, असेही शरद गोसावींनी सांगितले.
Leave a Reply