वाढत्या जागतिक तापमानाचा इशारा आता अधिक स्पष्ट झाला असून जगभरात सरासरी ७५ दिवस आणि भारतात सुमारे ३० दिवस उन्हाळा वाढणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. हवामानबदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
वाढलेले तापमान, अनपेक्षित उष्णतेच्या लाटा आणि सतत बदलणारे हवामान हे संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस हवामान करार अंतर्गत १.५ अंशांपर्यंत तापमानवाढ मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. या कराराला १९० हून अधिक देशांनी मान्यता दिली होती. मात्र कराराचे प्रभावी पालन झाले नाही तर उष्णतेचा कालावधी वाढण्याची शक्यता वाढली आहे.
तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब व विकसनशील देशांना बसणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. विकसित देशांकडे अत्याधुनिक साधने असल्याने ते या परिस्थितीचा तुलनेने चांगला सामना करू शकतात. मात्र भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आरोग्य, शेती, जलस्रोत यावर या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, तेल, गॅस आणि कोळशाचा वापर कमी करणे हे तापमानवाढ रोखण्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल ठरू शकते. पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवणे, इंधनावर नियंत्रण ठेवणे आणि पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.
जागतिक तापमानवाढीला वेळीच आळा घातला नाही तर पुढील काही दशकांत तीव्र उन्हाळा, दुष्काळ, पूर, आणि पर्यावरणीय संकटे वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण ही केवळ गरज नसून तातडीची जबाबदारी बनली आहे.


Leave a Reply