तीन मित्र, एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता एकाचवेळी न्यायाधीश! पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरचा ॲड. शुभम कराळे, बुरूंजवाडीचा सागर नळकांडे आणि कारेगावचा ॲड. अक्षय ताठे यांनी मैत्रीची नवी उंची गाठत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवले आहे. एकाच वेळी न्यायाधीश बनण्याच्या त्यांच्या या प्रवासाची चर्चा राज्यभर होत आहे. हे तिघे मित्र कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. वेगवेगळ्या महाविद्यालयांतून विधी शाखेची पदवी (एल.एल.बी.) मिळवल्यानंतर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एल.एल.एम.ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली सुरू करतानाच त्यांनी एकत्र न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहिले. चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर अखेर त्यांच्या या स्वप्नाला यश मिळाले.
न्यायाच्या दिशेने ठाम पाऊल
फौजदारी कायद्यात पारंगत असलेल्या ॲड. शुभम कराळे यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये फिर्यादी व पीडितांना न्याय मिळवून दिला. ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे हे दिवाणी न्यायालयात कार्यरत होते. कामाचा अनुभव आणि मैत्रीचा पाठिंबा यामुळे तिघांनी एकत्र परीक्षेची तयारी केली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश परीक्षेत बाजी मारली.
यशाची नवी कहाणी
राज्य लोकसेवा आयोगाने नुकताच ११४ न्यायाधीशांची निवड जाहीर केली, त्यात या तिघांचाही समावेश आहे. एका तालुक्यातून शिक्षणासाठी निघालेली ही तिन्ही मित्रांची साथ आता लोकसेवेत पोहोचली आहे. आता ते राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मैत्रीची खरी ताकद हीच असते – एकत्र झगडायचं, एकत्र जिंकायचं आणि एकत्रच समाजात परिवर्तन घडवायचं
Leave a Reply