नवी दिल्ली : सेमीकंडक्टर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात जगाचा ठाम विश्वास भारतावर बसला आहे. या क्षेत्रात भारताची वाढती भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या सेमिकॉन इंडिया शिखर परिषद-२०२५ चे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आता फक्त चिप निर्मितीत मर्यादित नसून एक मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. यामुळे जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान अधिक मजबूत होईल.” त्यांनी भारतातील अत्याधुनिक डिझाईन सेंटरचा उल्लेख करून येथे जगातील आधुनिक चिप्सची निर्मिती होत असल्याचे सांगितले.
२०१९ पासून ५० हून अधिक सेमीकंडक्टर कंपन्यांनी १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच २०२१ नंतर ३०० हून अधिक कंपन्यांनी भारतात प्रवेश करून तब्बल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे भारताच्या उत्पादन क्षमतेला मोठा आधार मिळत असून आगामी काळात आणखी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. मोदींनी जागतिक स्तरावर भारताच्या विश्वासार्हतेचा विशेष उल्लेख केला. भारतातील सशक्त उत्पादन स्थळे, कौशल्यसंपन्न मनुष्यबळ, स्थिर धोरणे आणि गुंतवणुकीस पोषक वातावरणामुळे भारत जगातील प्रमुख गुंतवणूक गंतव्यस्थान ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले. “सेमीकंडक्टर क्षेत्र हे भविष्यातील अर्थव्यवस्थेचे कणा ठरणार आहे. भारताने योग्य वेळी आवश्यक धोरणात्मक पावले उचलली असून त्यामुळे या क्षेत्रात भारताला अग्रस्थान मिळेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या परिषदेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह देश-विदेशातील उद्योगक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply