पोलिस कर्मचाऱ्यांकडून बॅटऱ्या आणि दुचाकींची चोरी; बीडमध्ये खळबळ

बीड : ड्रीम इलेव्हन (Dream 11) आणि रमी (Rummy) ॲप्समध्ये पैसे गमावल्याने कर्जबाजारी झालेल्या एका सहायक फौजदाराने कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पोलीस कर्मचाऱ्याने सुरुवातीला बॅटऱ्या चोरल्या आणि जामिनावर सुटल्यानंतर त्याने सात दुचाकींचीही चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात हा सहायक फौजदार आणि इतर दोघांचा समावेश आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

अमित मधुकर सुतार (वय ३५, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार) असे या सहायक फौजदाराचे नाव असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता. २४ डिसेंबर २०२४ रोजी सुतार याने इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्या होत्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात त्याच्याकडे तब्बल ५८ बॅटऱ्या आढळून आल्या. जामिनावर बाहेर आल्यानंतरही सुतारच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला नाही. त्याने स्वराज कोंडीराम बोबडे (वय २६, रा. अंबिका नगर, बीड) आणि हितोपदेश गणेश वडमारे (वय ३०, रा. अंकुशनगर, बीड) यांच्या मदतीने सात दुचाकींची चोरी केली. स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा का होईना, पण या तिघांना अटक करून त्यांची गुन्हेगारी कृत्ये उघडकीस आणली आहेत.

जालना येथेही पीएसआय चोरटा

बीडमधील या घटनेने पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असतानाच, जालना येथेही अशाच प्रकारची घटना एप्रिल २०२५ मध्ये समोर आली होती. जालना येथे प्रल्हाद मांटे हा चोरांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचे उघड झाले होते, ज्यात अहमद शेख नावाचा चोरटा बीडचाच रहिवासी होता. या दोन्ही घटनांमुळे पोलीस दलातील काही व्यक्तींच्या गुन्हेगारी प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *