जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय : मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजासाठी सरकारने जारी केलेल्या नव्या जीआरवरून अनावश्यक संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीका मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी केली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जर या जीआरची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली, तर मराठा समाजाला प्रचंड फायदा होणार असून आरक्षणाच्या मागणीबाबत होणारे दगाफटके टाळले जातील.

जरांगे म्हणाले की, सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून त्याचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सुविधांचा लाभ घेता येईल. मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये दाखल झाल्यास, ओबीसी संस्थांच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील समाजालाही फायदा होईल. त्यामुळे या निर्णयावर विनाकारण शंका उपस्थित करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने हे काम अधिक वेगाने करावे, अशी मागणीही जरांगे यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, जर दगाफटका झाला तर संपूर्ण आंदोलन उग्र होईल. “आपल्याला काहीही मिळाले नाही, असे बॉम्ब कोणीही मारत नाही,” असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर बंदूक ठेवून आंदोलन केले, या संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “मी राजकीय पक्षांचा बेंबट नाही, मग कसल्या बंदुकीखाली येणार?” तसेच, “मंत्रिमंडळ बैठकीला जीआरमुळे अडथळे येत असतील, तर प्रश्न पडतो की, सरकार चालवणारे खरे मालक कोण?” असा थेट सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जरांगे यांनी सरकारला इशारा देत स्पष्ट केले की, जीआरची अंमलबजावणी पारदर्शकतेने केली नाही, तर संघर्ष उग्र होणार आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *