निलंबित होऊन पुन्हा ये; ही मानसिकता आता बदलली पाहिजे, असा रोखठोक इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिला. महसूल विभाग हा सरकारचा चेहरा आहे आणि त्यातूनच विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकारायचा आहे, असं सांगत त्यांनी तलाठ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनी पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन केले. पुण्यात आयोजित महसूल विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले, काम करताना चुकाही होतात, पण ती चुकून झालेली असावी. मुद्दाम एकही चूक केली तर ती सहन केली जाणार नाही. निलंबनाच्या पत्रावर सही करताना मलाही दुःख होतं, पण काही अधिकारी सर्व मर्यादा ओलांडतात. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते पुढे म्हणाले,महसूल विभागाने २०२९ पर्यंत सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपला ठसा उमटवला पाहिजे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तंत्रज्ञानात बदल करणे गरजेचं आहे.”
‘मी सांगितलं म्हणून करू नका, योग्य वाटलं तरच करा’- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देताना बावनकुळे म्हणाले, मी चुकीचं काम सांगणार नाही. पण जर एखादं काम शक्य नसेल, तर ‘हे होणार नाही’ हे सांगायची हिंमत ठेवा. तुमचं खरं रक्षण फक्त कागद आणि पेनच करतात. एका तहसीलदाराने मृत व्यक्तींची नावे सात-बारावरून काढण्याची प्रभावी मोहीम राबवली. अशा पाच अधिकाऱ्यांचं कौतुक प्रत्येक विधानसभेत जाहीर करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. बावनकुळे म्हणाले, “तलाठ्यांपासून ते विभागीय आयुक्तांपर्यंत सर्वांनी नावीन्यपूर्ण योजना आखा. सरकार तलाठ्याचंही मार्गदर्शन घेण्यास तयार आहे. प्रत्येकाकडं काही तरी वेगळं कौशल्य आहे, ते योग्य कारणासाठी वापरा.” माझ्याकडे तलाठ्यांच्या पातळीवरील शेकडो निवेदने येतात. ही स्थिती बदलली पाहिजे. शेतकऱ्यांचं छोटं काम वेळेत पूर्ण व्हावं. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘शून्य सुनावणी’चे लक्ष्य ठेवावे.
माध्यमांना सामोरे जा, सत्य मांडा!’- चंद्रशेखर बावनकुळे
माध्यमांना घाबरू नका, त्यांना माहिती द्या. नकारात्मक बातमी आली तर त्याचं खंडन करा, पण चूक असेल तर सुधारणा करा. माध्यमांचा सकारात्मक वापर करा,”असा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांना रस्ता, वीज आणि पाणी मिळालं पाहिजे. त्यामुळे पाणंद रस्ते, शिवरस्त्यांचे काम युद्धपातळीवर करा. शेतकरी पुत्र नोकरी मागणार नाहीत, आत्महत्या करणार नाहीत. हे सुनिश्चित करा, असं बावनकुळे म्हणाले.
Leave a Reply