भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन

“भारतीय जनता पक्षाने गेल्या ४५ वर्षांत लोकशाही मूल्यांचा आदर राखत घराणेशाहीला कधीच प्राधान्य दिले नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा असून, याचमुळे एका चहाविक्रेत्यास देशाचे पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकली,” असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सह-संघटन मंत्री शिवप्रकाश, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “भाजपने सत्तेच्या शिखरावर पोहोचूनही कधीही लोकशाही मूल्यांचा त्याग केला नाही. देशातील १६ राज्यांत भाजप स्वबळावर, तर २१ राज्यांत मित्रपक्षांसह सत्तेत असूनही पक्षाने लोकशाहीशी नाळ कायम ठेवली आहे. भाजप हा नेत्यांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. “त्या काळात इंदिरा गांधींनी भाजप व संघविचारसरणीच्या कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात डांबले. अनेक कार्यकर्ते दोन वर्षे कारावासात होते, फक्त संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी,” असे त्यांनी सांगितले.

“अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना झाली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवून देशाचा विकास आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे,” असे फडणवीस म्हणाले. “सरकारमध्ये असलो तरी आमची नाळ पक्षाशी जोडलेली आहे. सत्तेचे बळ हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळाले असून, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे,” असेही फडणवीस यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो. त्यानंतर १५ वर्षांच्या संघर्षानंतर २०१४ मध्ये बहुमत मिळवले आणि पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला. मात्र २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेने पाठीत खंजीर खुपसल्यामुळे आमचे सरकार कोसळले. पण अडीच वर्षांतच जनतेने पुन्हा विश्वास दाखवत आम्हाला सत्ता दिली.” “२०२४ मध्ये मिळवलेले यश हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचे फलित आहे,” असे फडणवीस यांनी शेवटी नमूद केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *