नागपुरातील तणावग्रस्त परिस्थिती आता संपूर्णतः नियंत्रणात असून, शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये लागू करण्यात आलेला कर्फ्यू पूर्णतः उठवण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री फडणवीस, जे नागपूरचे आमदार देखील आहेत, त्यांनी सांगितले, नागपूरमध्ये कुठेही तणाव नाही. सर्व धर्मांचे लोक शांततेत एकत्र राहतात. त्यामुळे कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरच्या कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला होता. २० मार्चला नंदनवन आणि कपिलनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तर २२ मार्चला पाचपावली, शांतिनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामबाडा येथून कर्फ्यू हटवण्यात आला. अखेर रविवारी दुपारी ३ वाजता उर्वरित कोतवाली, तहसील, गणेशपेठ आणि यशोधरानगरमधूनही कर्फ्यू हटवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी घेतला. तरीही संवेदनशील भागांमध्ये गस्त सुरूच राहणार असून, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१७ मार्चच्या रात्री, एका ‘चादरी’ला आग लावल्याची अफवा पसरल्यानंतर मध्य नागपुरात हिंसाचार भडकल्याची माहिती प्रशासनाने दिली. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या मोर्चादरम्यान ही अफवा पसरवण्यात आली होती. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ झाली. या हिंसाचारात ३३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले, त्यामध्ये तीन पोलीस उपायुक्त (DCP) स्तरावरील अधिकारी देखील होते. आतापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारीच जाहीर केले होते की, नागपूरमध्ये ज्या गुन्हेगारांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले, त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. जर गरज भासली, तर त्यांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जाईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की, जे लोक हिंसाचाराच्या कटात सहभागी होते आणि ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जर त्यांनी नुकसानभरपाई दिली नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करून विकली जाईल.
या घोषणेमुळे नागपूरमधील हिंसाचारात सामील असलेल्यांना चांगलाच दणका बसला आहे. प्रशासनाकडून आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.
Leave a Reply