मुंबई: एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी महाराजा क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही दिली आहे. अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातातील एअर इंडियाच्या विमानामध्ये उड्डाणापूर्वी कोणताही बिघाड नव्हता आणि ते सुस्थितीत होते, असा दावा विल्सन यांनी केला.
मुख्य वैमानिक आणि सहवैमानिकाचा अनुभव:
एआय १७१ या अहमदाबाद ते लंडन विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना १० हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना ३४०० तासांपेक्षा जास्त तासांचा अनुभव होता, असे विल्सन यांनी स्पष्ट केले. या विमानाचे उजव्या बाजूचे इंजिन मार्चमध्ये आणि डाव्या बाजूचे इंजिन एप्रिलमध्ये तपासले होते, आणि त्यांची पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये होणार होती.
अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार
अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले केबिन क्रू दीपक पाठक यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. डीएनए चाचणीनंतर शुक्रवारी त्यांची ओळख पटल्यानंतर शनिवारी दुपारी बदलापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, अहमदाबाद अपघातात मृत्युमुखी पडलेले सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी त्यांचे पार्थिव मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मित्र, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. कुंदर यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणात तात्पुरती कपात
सध्याच्या सुरक्षा तपासणीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने २० जून ते जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात १५ टक्के कपात केली आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल आणि दुसरे तिकीट काढायचे असल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही विल्सन यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
Leave a Reply