माहितीच्या युगात, आधुनिक तंत्रज्ञान जिवनव्यापी…
इतके की,
जीव गुदमरतो…क्षणोक्षणी,
त्याला जोड प्रसार माध्यमांची,
ढगफुटी व्हावी तशा अंगावर येणार्या बातम्यां…
थोड्या आवश्यक, बहुतेक निरर्थक…
आणि त्या अफाट प्रवाहात
आपण वाहून चाललोय, जोरात.
आमचे पाय अधांतरी,
नाका – डोळ्यात जातंय पाणी, अनावश्यक शब्दांचे…
च्याट जीपीटी रुतून बसलाय मेंदूत
बोटं करताहेत स्क्रोल,
अविरत कोसळणार्या,
माहितीच्या फेसाळल्या जलधारा
भिजवतात आयुष्य, सारेच खुष.
सारे म्हंजे,
शाळेतली पोरं – पोरी,
अकाली वयात आलेली…
रस्त्यावरची विस्कटलेली भाजीवाली, सोसायटीचा म्हातारा वॉचमन,
एकटा हतबल चेहर्याचा पोलीस , गल्ल्यावरचा हास्यात रमलेला शेठ,
बसगाडय़ा हाकनारा ड्रायव्हर, विधान भवनात जंगली रमी खेळणारा मंत्री, बायांचे विडिओ पाहणारे आमदार, हातातील कामे सोडून नेटफ्लिक्सला चिकटून बसलेले सरकारी अधिकारी, अशक्य लोकल प्रवास मोबाईलसह सुखद करणारा बाबा- बुवांचा पॉश भक्त,
विडिओ कॉलवर रेंगाळलेली तरुणी… शेतातल्या झाडाखाली उन्ह तहान विसरून मोबाईलमध्ये गारवा शोधणारे लोक,
सगळेच…
हो, या देशातील बहुतेक,
काम सोडून, सगळं सगळं विसरून,
चिकटलेले स्क्रीनवर..दिवस रात्र…
सारंकाही बेभान…
बोलणे, नाचणे, सेल्फी, रीळ …
सोशल मीडियाचा ‘खूळ’ खुळा
जगणं झालंय खुलं, नव्हे उघडं.
सार्वजनिकतेचे जणू आलंय… तुफान.
आहाहा, आश्चर्यकारक…
पूरग्रस्त, पूरग्रस्तांसाठी वाटताहेत,
कधी सहमतीचे थंबसअप 👍, रडल्या चेहऱ्याची इमोजी …😢
तर कधी लाल – गुलाबी हृदय ❤️
असं बरंच काही.
पण,
संवेदना मात्र बधिर.
यंत्र माणसांसारखीच…
ते बोथट भाषेत होतात व्यक्त…
कधी असे, कधी तसे…
तर कधी नुस्तेच…
रिकाम्या डोक्याचे रिकामे डबे बडवीत… उडवीत.
असे आम्ही, कधी खुष… कधी उदास,
माहितीचा महापुर पुरवतोय बातम्या…
अशा, तशा आणि कशा कशा.
त्यातच आज आहे आनंद
डुबक्या मारण्याचा…
तर उद्या आहे धोका
माहितीच्या महापुरात
फुकट मरण्याचा …
*गेल्या दोन-चार दिवसातील बातम्यांमध्ये, माहितीच्या महापुरात एरवी नदिसणारे असेच “तीन ओळखीचे चेहरे” दिसले…*
आणि त्यांच्या विषयी लिहावंसं वाटलं…
*पहिले व्यक्तिमत्त्व*
*लहानपणी पाहिलेले शेषाद्री चारी उपराष्ट्रपती होणार?*
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले आहे. आपण सारेच जाणतो की, या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असून, त्यात आता आणखी एक नाव चर्चेत आले आहे, शेषाद्री चारी यांचे.
वैचारिक दृष्टीने मध्यममार्गी असणारे शेषाद्री चारी, यांचा रा स्व संघाशी दीर्घकाळचा संबंध आहे. संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्राचे ते संपादक राहिले आहेत. याशिवाय भारतीय समाज, बदलते राजकारण, हिंदुत्व आदी विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास असून, आंतरराष्ट्रीय संबंधांचेही ते जाणकार आहेत. चीन, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. काही पत्रकार मित्रांच्या मते, त्यांच्या नावावर संघ आणि पंतप्रधान मोदी दोघांचीही सहमती आहे. त्यामुळे ते उपराष्ट्रपती होऊ शकतात. अर्थात त्यामागे काही राजकीय डावपेच आहेत.
तामिळनाडूच्या राजकारणात आपली पकड मजबूत करण्याच्या सतत प्रयत्नात असलेली भारतीय जनता पार्टी रणनीतीपूर्वक पावले उचलत आहे. राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने एआयएडीएमकेसोबत आघाडी केली आहे. काही निरीक्षकांच्या अंदाजानुसार, काँग्रेस आणि डीएमकेला घेरण्यासाठी, तामिळ पार्श्वभूमी असलेल्या, तमिळ ब्राह्मण असणाऱ्या शेषाद्री चारी यांना उपराष्ट्रपतीपदी बसवून भाजप एक धोरणी डाव खेळण्याच्या तयारीत आहे…
तर अशा या शेषाद्रीजी यांना
मी महाविद्यालयीन काळापासून जवळून पाहिले आहे. कारण जवळपास पाचेक वर्ष ते आमच्या वाडा परिसरातील वनवासी भागात संघाचे प्रचारक म्हणुन काम करत होते. वाड्यातील वाणी आळीत राहणार्या डॉ पाल यांच्या घरी त्यांना जाता- येताना मी पाहिले आहे. खांद्यावर शबनम घेतलेला , पांढरा सदरा पँट परिधान करून चालणार्या, तटस्थ चेहर्याच्या शेषाद्री चारी यांच्याशी कधी बोलण्याचा तेव्हा प्रश्नच आला नव्हता. पण, त्यानंतर नागपूर तरुण भारत, इंडियन एक्सप्रेस आणि आय बी एन लोकमत मध्ये त्यांचे लेख, मुलाखती यानिमित्ताने संपर्क सुरू होता… तेव्हा वाड्यातील आठवणी निघत… काल डॉ पाल साहेबांशी बोलणे झाले, त्यावेळी शेषाद्रीजी यांच्या विषयी बोलणे झाले, उत्तम मराठी बोलणारे, महाराष्ट्रा विषयी जिव्हाळा असणारे शेषाद्री जी जर त्या महत्त्वाच्या उपराष्ट्रपती पदावर बसले तर तो आनंदाचा क्षण ठरेल. यावर कोणाचेच दुमत असणार नाही.
वरिष्ठ विचारवंत असणार्या शेषाद्री चारी यांच्या नावाच्या चर्चेकडे राजकीय वर्तुळात, विशेष संकेत म्हणून पाहिले जात आहे. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतरही भाजपसाठी तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये आव्हान ठरत आहेत. दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूत, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी भाजप आपला मजबूत पाया तयार करू इच्छित आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण, राजकारण आणि राजकीय डावपेच या निमित्ताने, जर एक पत्रकारिता, अध्यापन आणि सामाजिक जाण असलेली, बुद्धिवंत व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर बसत असेल, तर ते गढूळलेल्या राजकारणासाठी चांगलेच ठरेल…
*दुसरे व्यक्तिमत्त्व*
*निष्ठावंत विठ्ठल मोरे हतबल का झाले?*
कपाळावर टिळा, भरघोस दाढी, हसरा चेहरा आणि सतत कार्यकर्त्यांमध्ये दिसणारे आणि नवी मुंबईतील ठाकरे गटाची “ओळख” असणारे उपनेते, विठ्ठल मोरे यांनी परवा रात्री तडकाफडकी राजीनामा दिला. आपल्या पदाच्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या राजीनाम्याने नवी मुंबईतील ठाकरे गटाला धक्का बसला आहे. मुख्य म्हणजे विठ्ठल मोरे यांनी राजीनामा देताना माजी खासदार राजन विचारे यांच्यावर आरोप केला आहे. मी याचा येथे याचसाठी उल्लेख केला आहे, तो म्हणजे, अशा उघड तक्रारी करणे, नाराजी व्यक्त करणे हा विठ्ठल राव यांचा स्वभाव नाही.
मी त्यांना खूप आधीपासून ओळखतोय. १९९६ -९७ मध्ये ते तत्कालिन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सोबत वाड्याला आमच्या घरी आले होते. गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर, विठ्ठल मोरे त्यांच्या सोबत जातील असे अनेकांना वाटले होते. पण ते गेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले…
विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे असलेले ‘उपनेते’ पद देखील दिले होते. परंतु अचानक मोरे यांनी तडका-फडकी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
ते पत्र वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे, विठ्ठलराव यांच्यासारखे कार्यकर्ते, ही त्या पक्षाची ओळख असते. ज्यावेळी ती ओळख पुसली जाते, तेव्हा त्या पक्षाची जनतेमधील ओळख धूसर, अस्पष्ट होत जाते…
सूज्ञास फारसे सांगणे नलगे.
*तिसरे व्यक्तिमत्त्व*
*ठाणेकर विरुद्ध ठाणेदार*
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आणि ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे” अशी नजिकच्या काळातील ओळख आहे. कोपरी -पाचपाखडी विधानसभा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे हे प्रतिनिधित्व करत आहेत. नगरसेवक ते आमदार आणि मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा विलक्षण वेगवानं प्रवास ठाण्याने पाहिला आहे.
त्यामुळे काही ठाणेकर पत्रकार त्यांना “ठाणेदार” म्हणतात.
मात्र, याच ठाण्यात अनेक प्रश्न आहेत, ठाणेकरांना अनेक समस्यांना रोज तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचा पाढा, अस्सल “ठाणेकर” असणार्या न्या. अभय ओक यांनी परवा मांडला, तोही एकनाथ शिंदे यांच्यासमोर. याला निमित्त होते ठाण्यातील एका कार्यक्रमाचे.
आपण जाणताच की, न्या. अभय ओक हे सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यांची मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रतिमा अतिशय स्वच्छ होती. त्यामुळे अशा रामशास्त्री प्रभुणे बाण्याच्या न्यायमूर्तीनी ठाणेकरांच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या भूमिकेला महत्त्व प्राप्त होणे साहजिकच होते. याआधी त्यांनी, मीरा-भाईंदर मधील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना असाच टोला हाणला होता. त्यावेळी शहर विद्रुप करणार्या होर्डिंग्ज संदर्भात न्या ओक यांनी एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्या साक्षीने, सरकारी यंत्रणेची झाडाझडती घेतली होती. परिणामी पुढील काही दिवस त्या परिसरात राजकीय नेत्यांचे होर्डिग्ज लागत नव्हते. जे आता पुन्हा लागलेले असतात… तो भाग वेगळा.
पण यावेळेस न्या अभय ओक यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूनच ठाण्यातील समस्यांना वाचा फोडली नाही, तर सरकारी अनास्थेमुळे सामान्य माणसाला होणार्या त्रासाची कैफियत मांडली आहे.
कालपर्यंत तलावांचे, हिरव्या झाडीचे, सुंदर खाडीचे ठाणे शहर आता बदलून गेले आहे. मुंबईचा हा “उंबरठा” वाईट रस्त्यांसाठी, ट्रॅफिक जॅम आणि गर्दीसाठी ‘कुप्रसिद्ध’ ठरलाय. म्हणुन ओक साहेबांनी मांडलेले मुद्दे सामान्य ठाणेकर माणसाचा आवाज आहे, असे मला वाटते.
आज ठाण्यात ४०-५० मजली इमारती उभ्या राहात आहेत. ठाण्यातील घरे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. ठाण्यात परवडतील अशा वैद्यकीय सुविधा किती उपलब्ध आहेत, सर्वसामान्यांना परवडतील अशा शाळा आहेत का, असे प्रश्न न्या. अभय ओक यांनी उपस्थित केले.
विशेष म्हणजे ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या भीषण समस्येवर न्या. ओक यांनी बोट ठेवले. घटनेच्या २१ व्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ठाण्यात तशी परिस्थिती आहे का, असा सवाल न्या. अभय ओक यांनी केला. “ठाण्यात किती नवी उद्याने तयार केली, प्रत्येक शहरात असते तसे सेन्ट्रल पार्क ठाण्यात उभारले का?” असा खडा सवाल करत उद्याने उभी केली तर मोकळा श्वास घेता येईल, असे न्या. ओक यांनी जाहीर व्यासपीठावरून सुनावले. ज्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के प्रतिनिधित्व करतात, त्या ठाणे शहरात एवढ्या समस्या आहेत, याची जाणीव या निमित्ताने उपस्थितांना आवर्जून झाली… सगळ्यांचेच डोळे उघडले.
यानंतर एकनाथ शिंदे यांनीही न्या. ओक यांच्या मांडलेल्या समस्यांची दखल घेतल्याचे त्यांच्या भाषणात दाखवले. तसेच या समस्यांची नोंद जिल्हाधिकाऱ्यांना घेण्यास सांगून कार्यवाहीचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी ठाण्यात २५ एकरमध्ये सेन्ट्रल पार्क तयार केले आहे, कधी वेळ असेल तर नक्की पाहा, अशी विनंती वजा टिप्पणी शिंदे यांनी न्या. ओक यांना उत्तर देताना केली. तसेच ठाणे महापालिका हद्दीत १४५ उद्याने असल्याची माहितीही त्यांनी दिली…
ते काहीही असो, एक मात्र झाले, या निमित्ताने ठाणे हे समस्यांचे शहर असल्याचे अधोरेखित झाले आहे… ज्याचा ‘शिवसैनिक’ शिंदे यांना चांगलाच राग आलेला दिसला.असो.
पण, ही टीका जर त्यांनी सकारात्मकपणे घेतली आणि
ती रागाची ऊर्जा त्यांनी चांगले काम करण्यासाठी वापरली तर, “श्री स्थानक” म्हणुन इतिहासात प्रसिद्ध ठरलेले हे शहर पुन्हा गतवैभवाप्रत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे…
Leave a Reply