मुंबई : उर्वरित मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान ४० अंशांपर्यत नोंदवले गेले होते. पण गुरुवारपासून कमाल तापमानात मोठी घट झाली. सकाळी व रात्री हवेत गारवा जाणवू लागला आहे. आगमनास पोषक वातावरण असल्याने १३ मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत आहेत. याचाही परिणाम हवामानावर होत आहे.
पुढील आठवड्यात राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घसरलेल्या कमाल तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित उन्हाळा तीव्र नसल्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. वेस्टर्न डिस्टरबन्समुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस सक्रिय आहे. हवामानातील बदलामुळे हवेतील ओलसर वाढत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देखील मुंबईसह राज्यभर पाऊस पडेल. मुंबईच्या तुलनेत राज्यभरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक असेल, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले. राज्यात 15 आणि 16 मे रोजी पुन्हा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. पावसामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी होऊन 5 ते 6 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असं हवामानज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले. त्यामुळे उर्वरित मे महिन्यात तीव्र उष्णतेपासून सुटका मिळणार आहे.
Leave a Reply