राजकारणात काही भेटी गुप्त राहात नाहीत आणि काही भेटी राजकीय वादळाला जन्म देतात; विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अजून उजाळा मिळायच्या आतच, भाजपचे मंत्री आशिष शेलार, वडेट्टीवार आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया एकाच वाहनातून मूल एमआयडीसी येथील वडेट्टीवार यांच्या इथेनॉल फॅक्टरीमध्ये बंद दाराआड बैठक घेताना आढळले आणि हे प्रकरण लगेचच राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका ठरलं.
ही एक साधी भेट होती का, की सत्तासमीकरणाचा नवा अध्याय?
३१ मार्च गुढी पाडवा दिवशी, मंत्री शेलार चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना नागभीड येथे थांबले. तिथे आधीच उपस्थित असलेले आमदार भांगडिया आणि काही वेळाने स्वतःची गाडी सोडून शेलार-भांगडिया यांच्या गाडीत बसलेले विजय वडेट्टीवार हे दृश्य अनेक तर्कांना जन्म देणारं ठरलं. या तिघांनी एकत्र मूलपर्यंत प्रवास केला आणि नंतर इथेनॉल प्रोजेक्ट साइटवर झालेल्या गुप्त बैठकीत सहभागी झाले.
या भेटीमुळे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला;वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?
मागील काही काळात वडेट्टीवार यांच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराजीचे सूर स्पष्ट जाणवत होते. प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याचा मनात खदखद आणि राजकीय गुरू अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरते. वडेट्टीवारही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपत प्रवेश करणार का? राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना मोठे बक्षीस मिळू शकते. या चर्चांना अधिक बळ देणारी गोष्ट म्हणजे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वडेट्टीवार यांच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यासाठी हेलिपॅडपासून संपूर्ण तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, वडेट्टीवार यांचा भाजपप्रवेश आता फक्त चर्चेचा विषय राहणार का, की प्रत्यक्षात राजकीय नाट्य घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असताना, एकमेव काँग्रेस आमदार वडेट्टीवार भाजपमध्ये गेले, तर जिल्ह्याचं राजकारणच बदलून जाईल. या घडामोडींवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, आणि भाजप नेत्यांचं अंतर्गत मत काय आहे;याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Leave a Reply