मुंबई : राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतूवरून आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागणार नाही. ही सुविधा गुरुवार, २१ ऑगस्टपासून लागू करण्यात आली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी याबाबत माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ही माफी दिली गेली आहे.
पर्यावरणपूरक वाहनांना चालना देणे, कार्बन व प्रदूषणकारी वायू कमी करणे आणि नागरिकांना ई-वाहन खरेदीस प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. या योजनेमुळे खासगी तसेच प्रवासी इलेक्ट्रिक कार, बस आणि इतर वाहनांना टोल माफीचा लाभ होणार आहे. अटल सेतूवर दररोज सुमारे ६० हजार वाहने धावतात. त्यापैकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मर्यादित असली, तरी ती सातत्याने वाढत आहे. सध्या मुंबईत नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २२,८०० आहे. त्यात १८,८०० हलकी चारचाकी, २,५०० हलकी प्रवासी वाहनं, १,२०० अवजड प्रवासी वाहनं आणि ३०० मध्यम प्रवासी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे टोल माफीमुळे अनेक वाहनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल.
अटल सेतूनंतर पुढील दोन दिवसांत समृद्धी महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावरही इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी लागू होणार आहे. यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल, असे परिवहन विभागाने सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवासी व खासगी वाहनधारकांना थेट फायदा होणार असून, पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळेल. वायूप्रदूषण कमी करण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी ही पावले महत्त्वाची ठरणार आहेत. महाराष्ट्रात ई-वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकारकडून विविध प्रोत्साहन योजना राबविल्या जात आहेत.
Leave a Reply