गडचिरोली/हजारीबाग : झारखंडमधील हजारिबाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. गोहेरर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंटर्री जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी तीन माओवादी दहशतवाद्यांचा खातमा केला. यात केंद्रीय समितीचा जहाल माओवादी नेता सहदेव सोरेन याचा समावेश असून त्याच्यावर आणि इतर दोन्ही माओवाद्यांवर मिळून चार कोटींहून अधिकचे इनाम घोषित करण्यात आले होते.
चकमकीत ठार झालेल्यांमध्ये सहदेव सोरेन व्यतिरिक्त केंद्रीय समिती सदस्य रघुनाथ हेम्ब्रम आणि स्पेशल एरिया कमिटी सदस्य तसेच झोनल कमिटी सदस्य बिरसिंग गांझू यांचा समावेश आहे. हे तिघेही अनेक वर्षांपासून झारखंड आणि आसपासच्या राज्यांत माओवादी हिंसाचारात सक्रिय होते. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांवर हल्ले, शासकीय मालमत्तेची तोडफोड, तसेच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर आहेत.
ही मोहीम कोब्रा २०१ बटालियन आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने राबवली. जवान जंगलात गस्त घालत असताना दडून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनीही तत्काळ प्रतिउत्तर देत त्यांना कोंडीत पकडले. काही वेळ चाललेल्या या चकमकीनंतर तिघे माओवादी ठार झाले. घटनास्थळावरून AK-47 रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, या कारवाईत सर्व जवान सुखरूप परतले.
झारखंडमध्ये चालू वर्षात आतापर्यंत जवळपास ३० माओवादी संपवण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सहदेव सोरेनसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसणार आहे, असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.
Leave a Reply