परिवहन मंत्र्यांनी पकडली ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी; खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता!

मुंबई: राज्याच्या परिवहन विभागाने कोणतीही बाईक टॅक्सी ॲपला अद्याप अधिकृत परवानगी दिली नसताना, ‘रॅपिडो’ या ॲपने अवैधरित्या प्रवाशांची बुकिंग घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच ‘रॅपिडो’ला रंगेहात पकडून परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीचा पर्दाफाश केला आहे. यामुळे आता खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने मुंबई किंवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नसल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांना सांगितले होते.

मात्र, या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी स्वतः अनोळखी नावाने ‘रॅपिडो’ ॲपवर बाईक बुक केली. अवघ्या दहा मिनिटांत मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकात बाईक त्यांना घेण्यासाठी हजर झाली. अशाप्रकारे अनधिकृतपणे ‘बाईक ॲप’ चालवणाऱ्या संस्थेचा भंडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिवहन विभागातील अधिकारी आणि अशा संस्था यांच्यात साटेलोटे असल्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. राज्य शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले आहे.

त्यानुसार, केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या आणि विविध अटी-शर्तींचे पालन करणाऱ्या संस्थांनाच बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी अनधिकृत ठरतात. यापूर्वीही ‘उबर’ आणि ‘रॅपिडो’सारख्या संस्थांकडून अनधिकृत बाईक टॅक्सी सुरू असल्याबाबत अनेकदा वृत्त समोर आले आहे. त्यानंतरही सेवा बंद करण्यात येईल असे सांगत गेल्या महिन्यात परिवहन विभागाकडून या संस्थांविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला होता. या प्रकरणावर आता परिवहन विभागाला खोटी माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *