पिंपरी (जि. पुणे) : ‘ई-चालान’ प्रणाली विरोधात राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांनी बुधवारी मध्यरात्रीपासून बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सच्या अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यावसायिक संघटना सहभागी झाल्या आहेत.असोसिएशनचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की, ‘ई-चालान’ प्रणालीमुळे वाहतूकदारांकडून जबरदस्तीने दंड वसूल केला जात आहे, ज्यामुळे वाहतूकदारांवर मोठा अन्याय होत आहे. या प्रणालीविरोधात आणि इतर मागण्यांसाठी वाहतूकदारांनी यापूर्वीही कृती समितीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते.
या मागण्यांमध्ये पूर्वीच्या दंड माफीची मागणी, क्लिनर सक्ती रद्द करणे, आणि शहरांमध्ये वाहतुकीसाठी वेळेचे बंधन शिथिल करणे यांचा समावेश होता, परंतु शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनिल शर्मा, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, सचिव अनुज जैन, खजिनदार विनोद जगजंपी, उपाध्यक्ष सतनामसिंग पन्नू, सहखजिनदार तेजस ढेरे, सदस्य प्रमोद भावसार, सुभाष शर्मा, आणि सुभाष धायल उपस्थित होते. शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्यानेच हे आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचा फटका मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे वाहतूकदारांनी म्हटले आहे.
Leave a Reply