Tribal Development : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ‘गुरुशाला’ उपक्रम सुरु!

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार करत “गुरूशाला” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर, मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी “गुरूशाला” उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनबरोबर तीन वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.हा उपक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत सन २०२४-२५ ते २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होईल. दुसऱ्या टप्प्यात शिक्षक-शिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षक-अधिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यपन प्रक्रियेचे उद्धबोधन होणार आहे.‘गुरुशाला’ उपक्रमांतर्गत आश्रमशाळा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शाळा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत ४९७ प्रकल्पांचे सादरीकरण झाले. त्यापैकी २८७ प्रकल्प पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या १००, ठाणे आयुक्तालयाच्या ९१, नागपूर आयुक्तालयाच्या ५६, तर अमरावती आयुक्तालयाच्या ४० प्रकल्पांचा समावेश आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *